शांताराम वाघ, पुणे

उद्या २१ जून जागतिक योग दिवस. त्या निमित्ताने…

सुमारे आठ वर्षांपूर्वी याची सुरवात आंतरराष्ट्रीय पातळीवर झाली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रेरणेने भारताचे संयुक्त राष्ट्रसंघातील कायम प्रतिनिधी अशोक मुखर्जी यांनी राष्ट्रसंघात योग दिनासंबंधी एक ठराव दिला व तो 177 राष्ट्रांनी संमत केला. त्यानुसार 11 डिसेंबर 2014 रोजी संयुक्त राष्ट्र महासंघाने 21 जून हा दिवस जागतिक योग दिन म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली. 21 जून हा दिवस वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. उत्तरायण संपून दक्षिणायन याच दिवशी सुरू होते. या काळात मिळणारी ऊर्जा सर्व प्राणिमात्रांना लाभदायक ठरते. योग ही भारताने जगाला दिलेली अमूल्य व चिरंतन भेटच आहे.

आज जगातील सर्वात प्राचीन ग्रंथ ऋग्वेदामध्येही नारदीय सूक्त तसेच भगवदगीतेमध्येही अनेक वेळा योगाचे उल्लेख आहेत. महाभारताच्या शांतिपर्वामध्येही योगाचे उल्लेख आहेत. अगदी योगाचे मूळ दहा हजार वर्षापर्यंत मागे जाते. योगावर पतंजली मुनींनी इ.स. पूर्व 150 मध्ये योगसूत्रे लिहिली आहेत. प्राचीन मोहंजोदाडो, हडप्पा संस्कृतीमध्ये योग असलेल्या अनेक मूर्ती सापडल्या आहेत. आपली सहा दर्शनशास्त्रे आहेत. त्यातील योग्य हेसुद्धा एक दर्शनशास्त्र आहे. वेद उपनिषदे यातही योगाचे संदर्भ मिळतात.

पूर्वी केवळ ऋषी मुनी यांच्यापर्यंत सीमित असलेला योग आज अगदी सामान्य लोकांनाही माहीत होऊ लागला आहे. आज योगाचा प्रसार व प्रचार करण्याचे महत्त्वाचे काम गुरू बाबा रामदेव, बी के एस अय्यंगार, तसेच स्वामी शिवानंद यांनी सुमारे गेली अनेक वर्षे केले आहे. सर्वसामान्य लोकांना योग त्यांनीच परिचित करून दिला. गुरुदेव श्री श्री रविशंकर म्हणतात, योग म्हणजे निव्वळ व्यायाम आणि आसन नव्हे. हा भावनात्मक समतोल आणि त्या अनादी व अनंत तत्त्वाला स्पर्श करत आध्यात्मिक प्रगतीतील सर्व शक्यतांची ओळख करून देणारे शास्त्र आहे. शरीर व मन यांचा अन्यन्यसाधारण संबंध आहे. मन जर आनंदी निरोगी असेल, तरच शरीर व मन आनंदी असते. योग्य साधनेत ते साध्य केले जाते.

योग हा शब्द संस्कृतच्या युजपासून तयार झाला आहे. युज याचा अर्थ जोडणे असा आहे. यंदाच्या योग दिनाचे घोष वाक्य आहे, धेसर षेी र्हीारपळीूं. गेली सुमारे दोन वर्षाहून अधिक काळ सारे जग कोरोना या विषाणूविरुद्ध लढत आहे. भारतातसुद्धा ते संकट कायम आहे. या मुदतीत कोरोनाच्या तीन लाटा येऊन गेल्या. आता चौथी लाट केव्हा येईल त्याचा नेम नाही. कोरोनाला यशस्वीरित्या तोंड द्यावयाचे असल्यास व आपली प्रतिकारशक्ती वाढवावयाची असल्यास योगासारखा दुसरा पर्याय नाही. योगातील प्राणायाम, कपालभाती, अनुलोम विलोम, तसेच भ्रस्तिका, हे प्रकार निरोगी जीवनासाठी व रोग प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी आवश्यक आहेत. ध्यानात जाऊन मन एकाग्र करणे यातही समाधान मिळू शकते. मन स्थिर होते. योगाची आठ अंगे आहेत. त्यामध्ये यम, नियम, आसन, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा व समाधीही होत. योगाच्या सानिध्यात माणसाला सुख व आनंदाची प्राप्ती होऊ शकते. जीवनाकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टिकोन तयार होतो. आज जगातील अनेक राष्ट्रात व शहरात योग साधना शिकविली जाते. अनेक होतकरू योग शिकण्यासाठी भारतात येत आहेत. हीसुद्धा भारतीयांच्या दृष्टीने अभिमानाची व गौरवाची बाब आहे.

योग एक पूर्ण विज्ञान आहे. ती एक पूर्ण जीवनशैली आहे. एक पूर्ण चिकित्सा पद्धती आहे. योग्य आपणास तणावातून टेकडीकडे, नकारात्मकतेतून सकारात्मकतेकडे जाण्याचा मार्ग दाखवितो. आज काल अनेक शाळातून योगाचे धडे शिकविले जातात. पूर्वी औंध या सातारा जिल्ह्यातील संस्थानामध्ये सूर्यनमस्कार व त्याचे महत्व राजे भवानराव पंतप्रतिनिधींनी गावागावात व अनेक शाळांत रुजविले होते. त्यांचे चिरंजीव व ब्रिटनचे माजी हायकमिशनर अप्पासाहेब पंत यानीही परदेशात याचा प्रचार केला होता.

सूर्यनमस्कार हा सर्वांग सुंदर व्यायाम आहे. आज अनेक ठिकाणी योगाची शिबिरे आयोजित केली जातात. योग ही केवळ एक दिवसात करावयाची बाब नाही, त्यात सातत्य हवे तरच त्याचे परिणाम दिसू लागतात. सध्याच्या धावपळीच्या व गतिमान युगात, तसेच कोरोनासारख्या संसर्गजन्य रोगाशी यशस्वीरीत्या सामना करावयाचा असल्यास योगाची साथ धरावी लागेल. शरीर व मन यांचा संबंध आनंदी व सकारात्मक ठेवावयाचा असल्यास योगाची मदत होते. दररोज योगसाठी काही वेळा राखून ठेवणे, व तो नियमितपणे करणे, हे केल्यासच त्याचे शारीरिक व मानसिक फायदे मिळू शकतात. काळजी, द्वेष, भीती वाटणे यामुळे शरीरातील संप्रेरके वाढून रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. दैनंदिन जीवनात योगाचा योग्य तो अंतर्भाव केल्यास रक्तातील साखरेच्या नियंत्रणास मदत होते. तुम्ही युवक असा, की वयोवृद्ध किंवा निरोगी असा, की आजारी असा योगाभ्यास सर्वासाठी लाभदायक आहे. व तो सर्वाना प्रगतिपथावर घेऊन जातो. यंदाच्या योग्य दिनाचा मुख्य कार्यक्रम कर्नाटकातील म्हैसूर येथे होत आहे. केंद्र सरकारचे सर्व 75 मंत्री देशातील विविध ठिकाणी जाऊन योगाचा प्रचार करतील व योग्य दिनाचे महत्त्व जनतेला समजून सांगतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा