पुणे : शाळा सुरू होणार असल्यामुळे सुट्टीचा शेवटचा दिवस रविवारी होता. त्यामध्ये पावसाचे वातावरण असल्यामुळे सिंहगडावर पर्यटकांची गर्दी मोठ्याप्रमाणात काल झाली. सिंहगडाच्या घाटरस्त्यावरही कोंढणपूर फाट्याच्या पुढे गडाकडे जाणार्‍या रस्त्यावर वाहतूक कोंडी झाली होती. वाहनांच्या 7 ते 8 किलोमीटरच्या गडावर रांगा लागल्या होत्या. त्यामुळे पर्यटकांना वाहतूक कोंडीमुळे मनस्ताप सहन करावा लागला.

रविवारी सकाळपासूनच पर्यटकांनी रविवारी खडकवासला, सिंहगड व पानशेत परिसरात मोठ्या गर्दी केली होती. पावसाळी वातावरणात याठिकाणी पर्यटकांचा ओढा अधिक असतो. रस्त्यावर मोठ्याप्रमाणात वाहने उभी केल्यामुळे खडकवासला चौपाटीलासुध्दा वाहतूक कोंडी झाली होती. पोलिसांचा याठिकाणी बंदोबस्त असतो. मात्र पर्यटक आणि वाहनांची संख्या अधिक असल्यामुळे मोठा गोंधळ उडाला होता. सिंहगडावर 2341 दुचाकी व 674 चारचाकी अशी सायंकाळी सहा वाजेपर्यंत 3015 वाहने गडावर गेली होती. सिंहगड घाटरस्त्यावरही कोंढणपूर फाट्याच्या पुढे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. परिणामी अनेक पर्यटक व दुर्गप्रेमी कोंढणपूर फाट्यापासूनच वाहने वळवून परत जाताना दिसत होते.

राज्यभरातून सिंहगड पाहण्यासाठी नागरिक येत असतात. घाटामध्ये मोठ्याप्रमाणात रस्त्यावर वाहने लावण्यात येतात. वाहनचालक लेनची शिस्त पाळत नाहीत. रस्त्यावर अनेक ठिकाणी दगड पडले आहेत. वाहनतळाच्या दृष्टीने आवश्यक असलेले फलक कोठेच नाहीत. पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेवून घाटातील राडारोडा उचलणे आवश्यक आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत करण्यासाठी वनविभागाकडून कोणत्याच उपाययोजना करण्यात येत नाहीत, असे येथील नागरिकांकडून सांगण्यात आले आहे.

सुट्या असल्यामुळे शनिवार आणि रविवारी मोठ्याप्रमाणार गर्दी होत आहे. वाहतुकीचे नियोजन करण्यासाठी पोलिस कर्मचारी तैनात करण्यात येतात. नागरिकांनी सुध्दा सहकार्य करण्याची आवश्यकता आहे, असे पोलिस प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा