पर्यावरण निर्देशांकात पिछेहाट!

धोकादायक हवेची गुणवत्ता आणि वेगाने वाढणारे हरितगृह वायू उत्सर्जन यांमध्ये सर्वांत कमी गुण मिळाल्यामुळे पर्यावरण निर्देशांकात (एनव्हायरनमेंटल परफॉर्मन्स इंडेक्स) भारताचे स्थान 180 व्या म्हणजेच शेवटच्या क्रमांकावर घसरले आहे. पर्यावरणविषयी कामगिरीचा आढावा घेणार्‍या दोन आंतरराष्ट्रीय संस्थांनी अभ्यासांती सादर केलेल्या अहवालात हे जाहीर झाले आहे. हवामान बदलाची कामगिरी, पर्यावरणीय आरोग्य आणि ईकोसिस्टीम्स यांवर आधारित अभ्यासाला गुणांकन देऊन प्रसिद्ध केलेल्या अहवालात पर्यावरण संरक्षक उपायांचा अभाव आहे, असे देशाला मिळालेल्या गुणांवरून समोर आले आहे. उद्योगधंद्यांमध्ये जोरदार प्रगती करीत असताना पर्यावरणाला हानी पोहोचविणार्‍या गोष्टी थोड्याफार दुर्लक्षामुळे घडत गेल्या. परंतु त्यामुळे भारत देश प्रथमच म्यानमार, व्हिएतनाम, पाकिस्तान या तळाशी असणार्‍या देशांच्या पंक्तीत जाऊन पोहोचला आहे. म्हणूनच यापुढे विकासकामांतर्गत बांधकामांसाठी वृक्षतोड, रस्ते बांधण्यासाठी जंगलतोड, डोंगर पोखरणे यांचा अभ्यासपूर्ण पुनर्विचार करण्याची गरज आहे.

राजन पांजरी, जोगेश्वरी.

आंधळा विरोध

इस्राईलच्या धर्तीवर शासनाने तयार केलेल्या अग्निपथ या महत्त्वाकांक्षी योजनेस विरोधक आंधळा विरोध करत आहेत. युवकांना भडकावून सार्वजनिक संपत्तीचे नुकसान करत आहेत, हे दुर्दैवी आहे. या योजनेने देशातील युवक-युवतींना जीवनात खंबीरपणे. बंधू-भावाने जगण्याचे प्राथमिक शिक्षण मिळणार आहे. त्यांची मते व मनगटे मजबूत होण्यास मदत होणार आहे. व आज देशावर चोहो बाजूंनी येणारी संकटे थोपविण्यास मदत होणार आहे. हे विरोधक रोम जळत असताना फिडल वाजवत बसणार्‍या नीरोप्रमाणे वागत आहेत. शासनाच्या प्रत्येक चांगल्या गोष्टीस विरोध करून त्यांचीच वाटचाल अवघड करत आहेत.

श्या. दि. गंधे, पुणे.

योग्य वेळी घेतलेला निर्णय

काही व्यक्‍ती प्रवाहाच्या विरूद्ध जाऊन असामान्य कर्तृत्व करून दाखवितात. त्यापैकी एक भारतीय महिला क्रिकेटची गेली 23 वर्षे अविरत सेवा करणारी ‘लेडी कप्तान कूल नावाने ओळखली जाणारी मिताली राज. तू निवृत्त केव्हा होणार असा प्रश्‍न विचारण्याअगोदर मितालीने क्रिकेटच्या तीन्ही प्रकारातून निवृत्ती जाहीर केली. यामध्ये तीच्या कर्तृत्वाचा गौरव आहे.

माधव ताटके, पुणे.

पोलिसच गुन्हेगार

हैदराबादेत 2019 मध्ये एका महिला पशुवैद्यकीय डॉक्टरवर बलात्कार करून तिची निर्घृण हत्या करणार्‍या चार आरोपींना गोळ्या घालून ठार करणार्‍या पोलिसांनी त्यासाठी जे स्पष्टीकरण दिले होते ते खोटे आहे, असा सर्वोच्च न्यायालयाने नेमलेल्या माजी न्यायमूर्ती व्ही.एस.सिरपूरकर यांच्या अध्यक्षतेखालील समितीने काढलेला निष्कर्ष रास्तच आहे. कायद्याचे रक्षक असणार्‍यांनीच कायदा हातात घ्यावा याला काय म्हणावे? अपराध वा घटना कितीही गंभीर असली तरी गुन्हेगाराला न्याय वा शिक्षा देण्याचे काम न्यायदेवतेचे आहे. पोलिसांचे नाही. कायद्यापुढे लोकक्षोभ वा लोकानुनयाला अजिबात स्थान नाही. त्याबरोबरच न्याय निवाडा व्हायच्या आतच गुन्हेगारांना यमसदनी पाठवणे म्हणजे गुन्हेगारांना न्याय नाकारण्यासारखेच आहे. किंबहुना अशा बेकायदेशीर पोलिसी कारवाईत निरापराधसुद्धा बळी जाऊ शकतात. हा कितीतरी भयंकर अपराध होऊ शकतो. म्हणूनच देशाला हादरवणार्‍या हैदराबाद सामूहिक बलात्कार प्रकरणातील संबंधित पोलिसांवर खुनाचा खटला चालवण्याची समितीने केलेली शिफारस योग्यच आहे की, ज्यामुळे पोलिसांच्या अशा चकमक कारवायांना निश्चितपणे चाप बसेल, असे खात्रीने वाटते.

श्रीकांत जाधव, अतीत (जि.सातारा)

ग्रामीण भागात सर्प मित्रांची गरज

सर्प हे शेतकर्‍यांचे मित्र मानले जातात, पर्यावरण सांभाळण्याचेही ते काम करतात; मात्र आजही बर्‍याच अंशी ग्रामीण भागात सर्पविषयक अंधश्रद्धा, अज्ञान, अपुरी माहिती म्हणा असल्याचे जाणवते असे म्हटल्यास ते चुकीचे होईलच असे नाही. त्यामुळे होते काय? सर्पाला मारणे हेच सर्रास, बहुतांश ग्रामीण भागातून, गाव खेड्यातून पाहवयास मिळते. आणि म्हणूनच सर्वप्रथम सर्पांविषयक असलेली अंधश्रद्धा, अज्ञान दूर होणे अथवा करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. ग्रामीण भागातून अधिकाधिक सर्पमित्र तयार होण्याची नितांत आवश्यकता जाणवते. यासाठी शहरीस्थित ग्रामविकास मंडळांनी, स्थानिक स्वराज्य संस्था, ग्रामपंचायत, सामाजिक कार्यकर्ते यांनी निदान गावागावातून, वाडे, पाडे येथे जाणकार, अभ्यासक, सर्पमित्र यांना निमंत्रित करून तेथील नागरिकांना वारंवार शिबिरांच्याद्वारे सर्पांविषयी अभ्यासपूर्ण माहिती, त्यांची उपयुक्तता व्याख्यानाद्वारे दिली गेली, तर अज्ञान दूर होईलच, शिवाय भीती कमी होईल.

विश्वनाथ पंडित, चिपळूण

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा