कर्जबाजारीपणाला कंटाळून आत्महत्येचा संशय

मिरज : तालुक्यातील म्हैसाळ येथे पशु वैद्यकीय डॉक्टरच्या घरातील नऊ जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी दुपारी उघडकीस आली. वनमोरे कुटुंबियांचे म्हैसाळ गावात अंबिकानगर येथे एक व हॉटेल राजधानीच्या मागे एक असे दोन बंगले आहेत. एका घरात सहा मृतदेह तर दुसऱ्या घरात तीन मृतदेह सापडले. या सामूहिक आत्महत्येच्या घटनेने संपूर्ण मिरज तालुका हादरला आहे. घटनास्थळी पोलिस पंचनामा सुरू असून कर्जबाजारीपणातून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला.

आत्महत्या केलेल्यामध्ये पोपट यल्लाप्पा वनमोरे (वय ५२), संगीता पोपट वनमोरे (४८), अर्चना पोपट वनमोरे (३०), शुभम पोपट वनमोरे (२८), माणिक यल्लाप्पा वनमोरे (४९), रेखा माणिक वनमोरे (४५), आदित्य माणिक वन (१५) अनिता माणिक वनमोरे (२८) आणि अक्काताई वनमोरे (७२) या नऊ जणांचा समावेश आहे.

म्हैसाळ येथील नरवाड रोड जवळ असलेल्या अंबिका नगर चौकालगत मळ्यात डॉक्टर वनमोरे कुटुंबासह राहण्यास आहेत. अंबिकानगरमध्येच या कुटुंबाचे एक तर राजधानी कॉर्नर येथे दुसरे घर आहे. या घरात वनमोरे यांचे शिक्षक असलेले भाऊ त्यांच्या कुटुंबियांसह राहतात. सोमवारी सकाळपासून दोन्ही घराचा दरवाजा उघडला नव्हता. त्यामुळे आसपास राहणाऱ्या शेजाऱ्यांनी दरवाजा उघडून पाहिले असता एकाच घरात सहा जण विष घेऊन आत्महत्या केल्याचे दिसले.

त्यानंतर दुसऱ्या घरात तिघांचे मृतदेह सापडले. एकाच कुटुंबातील नऊ जणांनी विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केल्याचे स्पष्ट झाले. हे दृश्य पाहताच येथील रहिवाशांनी याबाबत तातडीने पोलिसांना माहिती दिली. या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच मिरज ग्रामीण पोलिसांसह वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी म्हैसाळकडे धाव घेतली.

जिल्हा पोलीस अधीक्षक दिक्षित कुमार गेडाम, पोलीस उपाधीक्षक अशोक विरकर, अप्पर पोलीस अधीक्षक मनीषा दुबुले यांच्यासह मिरज ग्रामीण पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला. सदर कुटुंबाने कर्जबाजारीपणाला कंटाळून सामूहिक आत्महत्या केल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेने म्हैसाळ परिसरात हळहळ व्यक्त होत आहे. घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. या गर्दीला पांगविण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावला होता. या सदर घटनेचे गांभीर्य ओळखून कोल्हापूर परिक्षेत्राचे पोलीस महासंचालक मनोज लोहीया यांनी घटनास्थळी भेट देऊन अधिकाऱ्यांना तपासाबाबत मार्गदर्शन केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा