सोलापूर :शेतकरी नेते सदाभाऊ खोत यांनी एका हॉटेलचालकाचे 66 हजार रुपयांचे बिल थकविल्याची घटना उघडकीस आली आहे. विशेष म्हणजे हॉटेल मालकाने बिल भरावे यासाठी त्यांच्या वाहनाचा ताफा नुकताच अडविला होता. हॉटेलमध्ये मेजवानी केल्यानंतर बिल दिले नाही. त्यामुळे सदाभाऊ खोत यांच्या वाहनाचा ताफा अडविला. सदाभाऊ खोत सोलापूर जिल्ह्यात कार्यक्रमासाठी गेले असताना हा प्रकार नुकताच घडला. हॉटेल मालकाने सदाभाऊ खोत यांचा ताफा थांबवून याबाबत त्यांच्याकडे विचारणा केली होती. या प्रकाराची राज्यात चर्चा होत आहे. सांगोला तालुक्यातील मांजरी येथील हॉटेल चालक व शेतकरी संघटनेचे माजी पदाधिकारी अशोक शिनगारे यांनी आधी निवडणुकीतील हॉटेलची उधारी द्या, मग पुढच्या कार्यक्रमाला जा, असे म्हणत सदाभाऊंच्या गाडीचा ताफा अडवला. आधी माझी उधारी द्या. मग तुम्ही पुढील कार्यक्रमासाठी जा. तुम्ही फोनही घेत नाही आणि घेतला तरी व्यवस्थित बोलत नाही, असे अशोक शिनगारे यांनी सुनावले. दरम्यान, मी त्या हॉटेल मालकाला ओळखत नाही. ती व्यक्‍ती राष्ट्रवादीचा कार्यकर्ता आहे. ते काळे झेंडे आणि निदर्शने करणार होते. पण माझा ताफा लवकर आला आणि पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. राष्ट्रवादीकडून मला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असे सदाभाऊ खोत म्हणाले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा