पुणे : इंधन आणि गॅसच्या दरवाढीचा भडका उडाल्यानंतर आता त्यात विविध प्रकारच्या डाळींची भर पडली आहे. उडीद, तुर, मुग या डाळींच्या किलोच्या दराने शंभरीचा आकडा ओलांडला आहे. तर मसुर डाळ शंभरीच्या जवळपास आहे. वाढलेल्या दरामुळे डाळी खरेदी करताना सर्वसामान्यांना विचार करावा लागत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्या किराणा यादीतून डाळी वगळण्यात येत आहेत.
लांबणीवर पडलेला पाऊस आणि केंद्र शासनाने एमएसपीत केलेली वाढ यामुळे सर्व प्रकारच्या डाळींच्या दरात 300 ते 800 रुपयांनी घाऊक बाजारात वाढ झाली आहे. त्याचाच परिणाम म्हणून किरकोळ बाजारात 100 रुपये किलोच्या आत असलेल्या डाळिंनी शंभरीचा आकडा ओलांडला आहे. आधीच सर्वसामान्य जनता महागाईत होरपळत असताना पुन्हा डाळींच्या दरात वाढ झाली झाल्याने सर्वसामान्यांना महागाईची झळ सोसावी लागत आहे. आवाक्याबाहेर दर गेल्याने सर्वसामान्य मात्र वाढलेल्या दराबाबत नाराजी व्यक्त करत आहेत.
सद्य:स्थितीत घाऊक बाजारात मागणीच्या तुलनेत पुरवठा कमी होत आहे. भुसार बाजारात सध्या चना आणि तुर डाळीची आवक कमी प्रमाणात होत आहे. तर, इतर डाळींची दररोज साधारण 100 ते 150 टन इतकी आवक होत आहे. सध्या खानावळी, मेस, हॉटेल, विविध समारंभ व्यवसाय सुरळीत सुरू झाले आहेत. हॉटेलात खणार्‍यांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. त्यामुळे सर्व प्रकारच्या डाळींच्या दरात वाढ असल्याची माहिती मार्केट यार्डातील डाळींचे व्यापारी जितेंद्र नहार यांनी दिली. किराणा किरकोळ बाजारात डाळींचे भाव शंभरी पार गेले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसात तूरडाळ, मूगडाळींच्या ग्राहकांचे प्रमाण कमी झाले आहे. साधारतः प्रतिकिलो 5 ते 7 रुपये डाळींचे भाव वाढले असल्याची माहिती किरकोळ दुकानदार उदय चौधरी यांनी दिली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा