कीव्ह : युक्रेनचे अध्यक्ष झेलन्स्की यांनी शनिवारी युद्धात प्रचंड हानी झालेल्या दक्षिण भागातील मायकोलायव्ह शहराला भेट दिली. तसेच तेथील परिस्थितीचा आढावा घेतला. रशियाने युद्ध सुरू केल्यानंतर प्रथमच त्यांनी या शहराला भेट दिल्याने या भेटीचे महत्त्व वाढले आहे.

झेलन्स्की यांच्या कार्यालयाने या भेटीची चित्रफीत प्रसिद्ध केली आहे. त्यात रशियाने केलेल्या हल्ल्यात मोठ मोठ्या इमारतींचे झालेले नुकसान दिसत आहे. शहराची पाहणी करण्याबरोबर स्थानिक अधिकार्‍यांशी झेलन्स्की यांनी बैठक घेतली. मायकोलायव्ह शहरावर रशियाने केलेल्या हल्ल्यात दोन जण ठार झाले तर 20 जखमी झाले. या हल्ल्यानंतर दुसर्‍या दिवशी झेलन्स्की हे पाहणीसाठी तेथे पोहोचले. तेव्हा गव्हर्नर विटालिय कीम यांनी इमारतींचे झालेल्या नुकसानीची माहिती त्यांना दिली.

एका उंच इमारतीला भगदाड पडले असून त्यातून दुसर्‍या बाजुकडील इमारती सहज दिसतात, असे चित्रफीतीत दिसते. इमारतीच्या खिडकीवर निळ्या आणि पिवळ्या रंगातील राष्ट्रध्वज फडकत असल्याचे दिसले.

झेलन्स्की यांनी या दौर्‍यात स्थानिक अधिकार्‍यांशी चर्चा केली. जमिनीखालील बेसमेंटमध्ये त्यांनी ही चर्चा केली. आर्थिक परिस्थिती, पाणीपुरवठा पूर्ववत करणे आणि शेतीची स्थिती यावर त्यांनी चर्चा केली. या शिवााय जमीन आणि समुद्रातून होणार्‍या संभाव्य हल्ल्याबाबत विचारविनिमय त्यांनी केला.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा