फेरफटका : प्रा. विकास देशपांडे

अतिशय थंडीच्या मोसमात कॅनडामध्ये चक्क 49.6 अंश सेल्सिअस तपमान! अशी कोणी कल्पनाही केली तरी त्याला वेड्यात काढले जाईल; पण आता यापुढे कदाचित अशा ‘वेड्यांचे’ घर भर थंडीतच उन्हात बांधावे लागण्याची वेळ येईल, अशी परिस्थिती तयार होऊ पाहत आहे. कॅनडातील लिटन (ङूीींेंप) नामक छोट्या गावाने वर नमूद केलेले (49.6 डिग्री सेल्सिअस) तपमान नुकतेच अनुभवले आणि ही तर केवळ सुरुवात आहे म्हणे ! आता भारताची राजधानी दिल्ली शहराने आजपर्यंतचे उच्चांकी म्हणून नोंदविलेले तपमान 48 अंश सेल्सिअस आहे, हे लक्षात घेतल्यास कॅनडाच्या तपमानाचे आकडे कोणालाही थक्क केल्याशिवाय राहणार नाहीत!

कॅनडाचे भौगोलिक स्थान लक्षात घेऊ. अमेरिका खंडाच्या उत्तरेस कॅनडा आहे. कॅनडाचा भूभाग अ‍ॅटलांटिक, पॅसिफिक आणि आर्क्टिक्ट महासागरांनी वेढलेला आहे. फ्रान्सच्या तुलनेत 18 पट भौगोलिक विस्तार असलेल्या कॅनडास युरोपला तुलनेने जवळचा म्हणून थंड हवेचा प्रदेश असेच सर्वसाधारणतः समजले जाईल; पण उपरोक्त आकड्यावर (49.6 अंश) नजर टाकली तर चित्र किती वेगाने बदलू शकते याची कल्पना येईल!

गेल्या अनेक दशकांपासून पर्यावरणतज्ज्ञ व शास्त्रज्ञ जगाला हवामानविषयक पेचप्रसंग तयार होत असल्याबद्दलचा इशारा देत आले आहेत. ते लक्षात घेतले तर जगाला उष्णतेच्या लाटा इथून पुढे अधिकाधिक प्रमाणात अनुभवण्यास मिळणार आहेत. या लाटांची तीव्रता आणि वारंवारता अशा दोन्हींत वाढ होईल असे इशारे मिळत आहेत आणि पर्यावरणीय धोक्याचे इशारे हे काही फक्त कॅनडा किंवा तत्सम प्रगत देशांनाच लागू पडतील असे नाही, तर मध्यपूर्व, दक्षिण आशिया, आफ्रिका व चीन हे देशही वरील धोकादायक परिस्थितीस सामोरे जाऊ शकतात हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे. भारतालाही हे धोक्याचे इशारे लागू आहेत, हे लक्षात आणून देण्याची गरज नाही. तरीसुद्धा नद्यांना माता मानणार्‍या आपल्या देशाची स्थिती तीर्थक्षेत्री घाटांवरती कशी आहे ? याचा विचार झाला पाहिजे.

पंतप्रधानांनी प्रथम मंत्रिमंडळात गंगा व अन्य नद्यांच्या स्वच्छतेसाठी स्वतंत्र खाते व एक मंत्री अशी योजना केली होती; परंतु मंत्री उमा भारती सध्या कुठे आहेत ? सांगता येईल का ? प्रत्येक दिवसागणिक हे आता अधिकाधिक स्पष्ट होत आहे की उष्णतेची आवर्तने वाढती आहेत. तसेच त्यांची तीव्रताही ! भारतीय तंत्र संस्था, गांधीनगर, गुजरातने केलेल्या अभ्यासानुसार 1990 नंतरच्या काळामध्ये 5 तप्त आवर्तने येऊन गेली आहेत. भारतात वाढत्या उष्णतेमुळे होणार्‍या मृत्यूंचे प्रमाणसुद्धा वाढत आहे. केंद्र सरकारच्या पृथ्वी-विज्ञान विभागाने प्रस्तुत केलेल्या आकडेवारीनुसार 17 हजाराहून अधिक व्यक्तींचा मृत्यू (1971 नंतर) उष्णतेच्या लाटांमुळे झालेला आहे. शिवाय या आकडेवारीनुसार उष्णतेमुळे होणार्‍या मृत्यूंच्या प्रमाणात याच कालावधीत तब्बल 62.2 टक्के एवढी वाढ नोंदविली गेली आहे. इथे हे नमूद केले पाहिजे की या परिस्थितीवर मात करण्याच्या दिशेने जगभर संशोधन चालू असले तरी प्रभावी उपाय-योजनांच्या आघाडीवर अपेक्षित यश मिळालेले नाही.

उष्णतेच्या लाटांचे प्रमाण वाढतेच राहिले तर रस्त्यावर, शेतांमध्ये ज्यांना कामे करावी लागतात त्यांची स्थिती कशी हलाखीची होऊ शकते, याची कल्पनाच केलेली बरी. या कामगारांचे उष्णतेपासून चांगले संरक्षण होऊ शकेल असे पेहराव तयार करावे लागतील. या दृष्टीने स्वातंत्र्य आंदोलनाच्या काळात लोकप्रिय झालेल्या खादीच्याच वस्त्रात अधिक सुधारणा करून उष्णतेपासून जास्तीची सुरक्षितता प्राप्त करता येईल काय, याबाबतही विचार होऊ शकतो. सध्या जगभरातील अनेक देश व शहरे यामधून उष्णता आटोक्यामध्ये राहण्याकरिता कृती आराखडे तयार केले जात आहेत. सन 2013 मध्ये भारतात अहमदाबाद महानगरात उष्णतेमुळे ज्यांना लागलीच त्रास सहन करावे लागतील अशा लोकसमूहांना निश्‍चित करणे, उष्णतेच्या लाटांची पूर्वसूचना देणे, विविध प्रातिनिधक समूहांचे समन्वयन साधणे याबाबत विचार करून कृती करण्यास सुरुवात झाली.

महाराष्ट्रात फडणवीस मुख्यमंत्री असताना तेरा कोटी झाडे लावण्याचा संकल्प करण्यात आला होता. त्यापैकी किती प्रत्यक्षात लागली हे समजले नसले, तरीही काही दमदार कामगिरी झाली असेल अशी आशा करता येईल काय? महाराष्ट्रात सुरुवात झालेल्या महात्मा गांधी रोजगार हमी योजनेअंतर्गत वृक्ष-लागवडीच्या कार्यक्रमाचा अंतर्भाव मोठ्या प्रमाणात करूनसुद्धा उष्णतेच्या लाटेवर बरेचसे नियंत्रण प्रस्थापित करणे शक्य आहे. सध्या बांधकामात जे साहित्य वापरले जाते त्यामुळेही घरे तापतात असे अनुभवास येते. आगामी काळात उष्णतेचा प्रतिकार करेल असे बांधकाम साहित्य निर्माण करण्यावर व तसे संशोधन करण्यावर शासन व अन्य पर्यावरणाच्या क्षेत्रात काम करणार्‍या संस्थांनी भर दिला पाहिजे. सर्वांत महत्त्वाचे म्हणजे आगामी काळात उष्णतावाढीची समस्या ही सर्व मानवजातीसमोर असलेले मोठे आव्हान आहे याची जाणीव ठेवून शासन, स्वयंसेवी संस्था, संशोधक आणि जनता यांनी एकत्र येत भगीरथ प्रयत्न सुरू करणे तातडीचे आहे!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा