जागतिक व्यापार संघटनेत भारताचे मुद्दे गाजले

जिनिव्हा : जागतिक व्यापार संघटनेच्या बैठकीत मासेमारीवरील अनुदानासह अन्य सर्व मुद्द्यांवर एकमत झाल्याचे वृत्त आहे. गेल्या दोन रात्रींपासून संघटनेच्या सदस्यांमध्ये विविध मुद्द्यांवर चर्चा झाली. त्याअंतर्गत पॅकेज, कोरोनाविरोधात उचलण्यात येणारी पावले आणि धोकादायक मासेमारी रोखणे आणि त्यावर अनुदान सुरू ठेवण्याबाबत ठोस चर्चा झाली. विशेष म्हणजे बैठकीत भारताने मांडलेले मुद्दे गाजले असून, त्या दिशेने बैठकीत विचार झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

जागतिक व्यापार संघटनेची बैठक तब्बल 9 वर्षांनंतर झाली. त्यामुळे या बैठकीला मोठे महत्त्व प्राप्‍त झाले. अखेर बैठकीत मासेमारीसंदर्भातील अनुदान कायम ठेवण्याबाबतचा करार झाला आहे. यापूर्वी 2013 मध्ये बाली येथे बैठक झाली होती. अनेक देशांनी व्यापारी करारांवर स्वाक्षर्‍या केल्या आहेत.

विशेष म्हणजे बैठकीत सर्व करार हे एकमताने मंजूर झाले. लशी काही काळांसाठी पेटंट मुक्‍त करण्याबाबत लवकरच निर्णय अपेक्षित आहे. अमेरिकेकडून हिरवा कंदील मिळावा, यासाठी हा निर्णय थांबला असल्याचे सूत्रांनी सांगितले.

खोल समुद्रात मासेमारीला कायद्यानुसार आता मान्यता दिली आहे; पण बेकायदा मासेमारीला विरोध केला आहे. भारताचा विचार करता अन्य आर्थिक क्षेत्रे आता बळकट करण्यास चालना मिळणार आहे. त्यामुळे बैठकीत हा मोठा विजय मानला जात आहे. मच्छीमार, शेतकरी, अन्‍न सुरक्षा, बहुपक्षीयता आणि व्यापार, डिजिटल इकॉनॉमी आणि लघु, सूक्ष्म आणि अवजड उद्योग याबाबत भारताने मांडलेल्य मुद्द्यांना पाठिंबा मिळाला आहे.

बैठकीत भारताने बहुजन हिताय बहुजन सुखाय, हा मुद्दा मांडला. त्यामध्ये विकसनशील आणि कमी विकसनशील देशांचे नेतृत्व केले. तसेच या देशांचे एकमत करून मार्ग काढण्याबाबत वचनबद्ध असल्याचे सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्य करणारे वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी मच्छीमार, शेतकरी यांचे प्रश्‍न आणि हित बैठकीत जोरदार मांडले. त्यांचे अनुदान कायम राहावे, असा आग्रह धरला. तसेच अन्‍न सुरक्षा आणि कोरोना काळातील मानवी प्रश्‍नांचा ऊहापोह केला. त्यामुळे बैठकीत महत्त्वाच्या आणि किचकट प्रश्‍नांना वाचा फुटली. तसेच बैठकीला दिशादेखील मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा