शैलेंद्र रिसबूड, डोंबिवली

‘केसरी’चे पहिले संपादक गोपाळ गणेश आगरकर यांचा आज (17 जून) स्मृतिदिन त्यानिमित्ताने…

देशाच्या इतिहासात दै. ’केसरी’ आणि ’मराठा’ या वृत्तपत्रांची दखल घेतल्याशिवाय तो परिपूर्ण होणार नाही. लोकमान्य टिळक आणि गोपाळ गणेश आगरकर यांचे अनन्यसाधारण उपकार वृत्तपत्र सृष्टीवर आहेत. टिळक व आगरकर हे मूलतः नि:स्वार्थी आणि प्रामाणिक होते. त्यांना भौतिक सुखाचे वेड नव्हते. दोघांनीही सुरवातीपासूनच स्वतंत्र वृत्ती दाखवून दिली होती व अन्याय त्यांना सहन होत नसे. हिंसक शाब्दिक लढाया होऊनदेखील त्यांच्यातील ममत्वाचा झरा पूर्णतः आटला नाही. त्यांचे मार्ग वेगळे असले तरी अंतिम ध्येय एकच होते. ब्रिटिशांची अर्थनीती व भारताची आर्थिक परिस्थिती याबाबत दोघांचे विचार सारखेच होते. ’केसरी’ व ’मराठा’ यांना मिळालेले यश असाधारण होते. देशातील स्थानिक भाषांमधून निघणार्‍या वृत्तपत्रांमध्ये ’केसरी’चे वितरण सर्वाधिक होते.

सोमवार, दिनांक 14 जुलै 1856 रोजी आगरकरांचा कराडमध्ये जन्म झाला. टिळक आणि आगरकरांचे जन्म वर्ष एकच. अवघ्या नऊ दिवसांच्या अंतराने जन्माला आलेल्या या दोन मराठी माणसांचे परस्परांशी आणि समाजाशी असणारे ऋणानुबंध म्हणजे इतिहासाचा एक आविष्कारच म्हटले पाहिजे. घरातील गरिबीमुळे वयाची दहा वर्षे आजोळी गेली व अवघ्या इंग्रजी तीन इयत्तांचे शिक्षण कसेबसे पार पडले. त्यांना अगदी लहानवयात उदरनिर्वाहासाठी हात-पाय हलवणे भाग होते. पुढे कोणतेही अर्थसाह्य न मिळाल्याने त्यांना लहानसहान नोकर्‍या कराव्या लागल्या. तेराव्या वर्षी ते कारकून म्हणून काम करू लागले आणि मग कंपाउंडर झाले. एकदा ते कराड ते रत्नागिरी हे दीडशे मैलांचे अंतर पायी चालून गेले. रत्नागिरीतील एक श्रीमंत नातेवाईक आपल्या शिक्षणासाठी मदत करतील हा हेतू होता. पुढे ते पुण्याहून अमरावतीला त्यांचे मामा (भागवत) यांच्याकडे राहिले आणि 1875 साली मॅट्रिक परीक्षा पास झाले व हितचिंतकांच्या मदतीने पुण्यात डेक्कन कॉलेजमध्ये रुजू झाले.

त्यांच्या संपूर्ण महाविद्यालयीन जीवनामध्ये त्यांच्याकडे केवळ एकच सदरा होता. लहानपणी त्यांच्यावर धार्मिक किंवा कोणत्याही प्रकारचा प्रभाव नव्हता, त्यामुळे ते अत्यंत स्वतंत्रपणे वाढले व जगाविषयी चिकित्सक झाले. टिळक-आगरकरांच्या कौटुंबिक पार्श्वभूमी भिन्न असल्याने त्यांच्या स्वभाववृत्तीमध्ये भेद होता. तत्कालीन समस्यांना दोघांनीही परस्पराहून भिन्न प्रतिसाद दिला, कारण बालपणी त्यांच्यावर पडलेले भिन्न प्रभाव व स्वभाववृत्ती या मागची मुख्य कारणे होती. आगरकरांना कल्पित साहित्याची आवड होती, तर टिळकांनी तथ्याधिष्ठित गोष्टींकडे कल होता. पारंपरिक धर्माचा प्रभाव नसल्याने आगरकर पाश्चात्त्य तात्त्विक वाङ्मयात गुंतून गेले.

टिळक व आगरकर हे पुण्याच्या डेक्कन कॉलेजच्या वसतिगृहातील सहनिवासी. ही ओळख 1879च्या वेळची. या काळात त्यांची मैत्री दृढ झाली. चर्चा रंगू लागल्या आणि वाद झडू लागले. टिळक आणि आगरकर यांच्यावर मिल-स्पेन्सरचा संयुक्त प्रभाव होता. आगरकरांनी पाश्चात्त्य प्रभाव ग्रहण केला, तर टिळक मात्र पाश्चात्त्य विचारांच्या संदर्भात अधिक चिकित्सक राहिले व भारतीय परंपरा व धर्माभिमानाचे महत्त्व मनी बाळगत राहिले. कॉलेजमधील एका वादविवाद प्रसंगी आगरकरांनी ’समाजसेवेचा मी सर्व बाजूंनी थांग घेऊन पाहिले; पण मला अजूनही राजकीय सुधारणांऐवजी सामाजिक सुधारणा करण्याचे आजचे आमचे आद्य कर्तव्य आहे असे वाटते’ असे ते म्हणाले होते.

1879 मध्ये टिळक आगरकरांच्या सहवासात आल्यावर आणि शिक्षणाची कालमर्यादा संपत असल्यामुळे ही जोडी भावी कर्तव्याच्या विचारात गुंतली. ’शहाणे करुनि सोडावे सकलजन’ या ध्येयाविषयी त्यांच्यामध्ये दुमत नव्हते. या उद्देशाने कॉलेज परिसरामध्ये व इतरत्र दूरवर हे दोघेही तासन्तास भटकत असल्याची साक्ष आगरकरांनी लिहिलेल्या पुस्तकात आहे. यावरून टिळक-आगरकरांनी देशास वाहून घेण्याची पूर्वतयारी कशी चालवली होती याची अधिक कल्पना या प्रसंगातून होते. टिळक-आगरकरांच्या देशहिताच्या विचारांना न्यायमूर्ती रानड्यांनी देखील पाठिंबा दर्शविला होता. या जोडीचे कौतुक करताना ते म्हणाले, ’हे तरुण स्वार्थत्याग स्वीकारून देशसेवेला वाहून घेण्यास प्रवृत्त झाले आहेत. एक प्रकारे देशाच्या भाग्योदयाचे हे प्रसादचिन्ह समजून, त्या तरुणांचा हिरमोड करण्याऐवजी त्यांना मदत केली पाहिजे.’

आगरकर निर्धनावस्थेमधून वर चढले असता आणि पुढे द्रव्यप्राप्तीचा मार्ग मोकळा झाला असता त्यांनी देशकल्याणाचा खडतर मार्ग पत्करला. दारिद्र्याची दुःखं भोगून विद्वान झाल्यावर व त्या विद्वतेमुळे लक्ष्मीला आपल्याकडे खेचण्याची पूर्ण शक्ती अंगी असतानाही त्या शक्तीचा उपयोग समाजास वर काढण्याकरिता खर्चण्याचे आगरकरांनी मनात आणले. टिळक आणि आगरकरांनी स्वेच्छेने गरिबी व नि:स्वार्थ सेवेचे जीवन निवडले होते. डेक्कन कॉलेजमध्ये ’फेलो’ म्हणून रुजू झाल्यावर त्यांनी आपल्या आईला आपल्या स्वीकृत दारिद्र्याबद्दल लिहिलेल्या पत्रात ते म्हणतात, ’आपल्या मुलाच्या मोठमोठ्या परीक्षा होत आहेत. आता त्याला मोठ्या पगाराची चाकरी लागेल व आपले पांग फिटतील असे मोठाले मनोरथ तू करत असशील; पण तुला आताच सांगून टाकतो की, विशेष संपत्ती, विशेष सुखाची हाव न धरता मी फक्त पोटापुरत्या पैशांवर संतोष मानून सर्व वेळ परहितार्थ खर्च करणार आहे.’

लोकमान्य टिळकांनी 1919 च्या एका भाषणामध्ये महाविद्यालयीन काळातील आगरकरांचा व स्वतःचा विचार नमूद केला आहे. ते म्हणतात – ’आम्ही तरुण होतो. आमच्या देशाच्या अवस्थेच्या विचारांनी आमची डोकी गरम झालेली होती आणि दीर्घ चिंतन केल्यावर आमचे असे मत झाले होते की, केवळ शिक्षणातूनच आमच्या मातृभूमीची मुक्ती शक्य आहे’. देशाचे शिक्षण हाती घेऊन त्याद्वारे राष्ट्रजागृती घडवून आणणे, हे आपल्या आयुष्याचे ध्येय टिळक आणि आगरकरांनी अगदी तरुणपणीच ठरवून टाकले. अशा प्रकारे सरकारी नोकरीच्या मार्गाने ऐहिकदृष्ट्या सुखाचे व सहजसाध्य होण्यासारखे असतानाही त्यांनी आपला निश्चय ढळू दिला नाही.

आगरकरांच्या निखळ प्रामाणिक विचार संकल्पनेमुळे टिळक त्यांच्याकडे आकर्षित झाले. राष्ट्रभक्ती, स्वराज्यवाद, त्यागभावना या गोष्टी टिळक-आगरकरांनी एकत्र आणणार्‍या दुवा होता. एकत्र येऊन त्यांनी अनेक कृतिशील पावले उचलली. ’न्यू इंग्लिश स्कूल’, ’केसरी’, ’मराठा’ ’डेक्कन एज्युकेशन सोसायटी’ आणि ’फर्गुसन कॉलेज’ यांचा जन्म त्यातूनच झाला.

सरकारी नोकरीची बेडी तोडून विष्णुशास्त्री चिपळूणकर पुण्यात आले व भावी कार्याचा मार्ग जोपासू लागले. पुण्यात, ’न्यू इंग्लिश स्कूल’ स्थापन करून लवकरच त्याला ’केसरी’, ’मराठा’ या वृत्तपत्रांची जोड मिळाली. टिळकांच्या मते परकीय अमलातून निर्माण होणार्‍या राजकीय अन्यायाचा प्रश्न पहिल्यांदा हाताळायला हवा होता, तर सामाजिक अन्याय व जुलूमशाहीच्या बेड्या तोडणे हे आगरकरांना प्राथमिक कार्य वाटत होते. त्यामुळेच शैक्षणिक बाबतीत प्रयत्न सुरू करावेत, असा मध्यमार्गी विचार दोघांनी केला. स्वतःच्या हिमतीवर व स्वार्थत्यागाच्या तत्त्वावर सार्वजनिक काम करण्यासाठी पुढे आलेली मंडळी म्हणजे – ’चिपळूणकर, टिळक, आगरकर, आपटे आणि नामजोशी. पुण्यातील लोकांनी त्यांचे ’ग्रॅज्युएट पंचायतन’ असे नामकरणसुद्धा करून टाकले. ’ग्रॅज्युएट पंचायतन’ यांनी पुढे ’डेक्कन एजुकेशन सोसायटी’ची स्थापनासुद्धा केली. शिक्षणाने परक्या संस्कृतीचे पदवीधर निर्माण न करता, देशाभिमानी कर्तेपुरुष निर्माण करणे हेच राष्ट्रीय शिक्षणाचे ध्येय असून, अशा सुशिक्षित लोकांच्या हातून देशाचा सामाजिक व राजकीय दर्जा वाढवणे हेच पंचायतचे ब्रीद होते.

1881 च्या प्रारंभी, ’केसरी’ आणि ’मराठा’ ही वृत्तपत्र सुरू झाली. त्यातले ’मराठा’ हे दोन दिवस आधी प्रगटले आणि ’केसरी’ मागून लोकांसमोर आले. कालांतराने दोघांमध्ये मतांची विसंगती उद्भवल्यास ’केसरी’मध्ये ’मराठ्याला’ उद्देशून ’आमचे दादा’ असे शब्द वापरले जात. टिळक-आगरकरांनी इतिहास, समाजशास्त्र, अर्थशास्त्राचा सखोल अभ्यास केला, तो वृत्तपत्रासाठी वाढवला व त्यांची फळे जनतेला अर्पण केली. कर्तव्याची प्रेरणा टिळक-आगरकरांना लिहायला उत्तेजन देत होती. आपण जे लिहितो ते सामान्य वाचकांना रुचेल, पचेल व त्यामुळे त्यांचा विकास होईल इकडे लक्ष देऊन विषयांची मांडणी व निवड ’केसरी/मराठा’ मध्ये केली जात असे. धर्म व कायदा या विषयांवर टिळक लिहीत. त्यांची शैली अचूक, थेट व जोरकस होती; पण लेखात फारशी अलंकारिता नव्हती. आगरकरांचे लेखन त्यातील सामाजिक टीकेमुळे ठळक, विनोदबुद्धीमुळे व इंग्रजी लेखकांच्या संदर्भामुळे वेगळे उठून दिसत. ते सर्वसाधारणतः इतिहास, अर्थशास्त्र व सामाजिक विषयांवर लिहीत. पल्लेदार युक्तिवाद हा आगरकरांचा विशेष, तर लहानलहान पण अर्थवाही ठोस वाक्ये हे टिळकांच्या लेखनाचा मोठा गुण होता. वृत्तपत्रे काढली आणि त्या योगाने पहिल्याच वर्षी ’कोल्हापूर प्रकरणामुळे’ संकटाशी झुंजण्याची पाळी आली. त्यातून ही ’बाळ-गोपाळ’ जोडी निभावली. कारण लोकांची सहानभूती व प्रत्यक्ष मदत.

आगरकर हे ’केसरी’चे पहिले संपादक. त्यांच्या या संपादकीय कारकिर्दीबाबत (04 जानेवारी 1881 ते 18 ऑक्टोबर 1887), एक गोष्ट विशेषत्वाने जाणवते तो म्हणजे ते सामुदायिक जबाबदारीचे तत्त्व पाळत होते, त्यामुळे समाजाला न दुखावता नेमस्त मार्गाने सुधारणाविषयक विचार मांडत होते.

टिळक-आगरकरांमधील वाद अगदी विकोपास गेल्यामुळे दोघांची कुचंबणा होऊ लागली. त्यामुळे 1887 च्या अखेरीस आगरकरांनी ’केसरी’चा राजीनामा दिला, तर पुढे 1890 मध्ये टिळकांनी डेक्कन एज्युुकेशन सोसायटी सोडली व ती संस्था आगरकरांच्या गटाच्या ताब्यात गेली. छापखाना व वृत्तपत्र कर्जासकट आगरकारांनी घ्यावी, असा प्रथम प्रस्ताव देण्यात आला; पण संपादक होणे हे त्यांच्या जीवनातील ध्येय नसल्यामुळे हा प्रस्ताव नाकारण्यात आला. त्यापेक्षा वृत्तपत्र बंद करायलाही आपली हरकत नाही, असे ते म्हणाले. यावरून आगरकर टिळकांप्रमाणे करारी होते; पण कर्ते नव्हते असा समज न. चिं. केळकर कृत ’टिळक-चरित्रात’ आढळतो.

भांडणाच्या खुमखुमीत टिळक-आगरकरांपैकी कोणीच कमी नव्हते. अधिक कुरापतखोर म्हणून आगरकरांकडे बोट दाखवता येईल; पण एकदा का डिवचले की, टिळक चांगलीच परतफेड करत असत. संमतीवय कायदा, पंडिता रमाबाई, शारदासदन या प्रकरणात तर भांडण विकोपास गेले. त्यांच्या कलहाचा पहिला स्फोट बालविवाह प्रतिबंध विधेयकासंदर्भातील चर्चेवेळी झाला. आगरकर कायदा आणायच्या बाजूने होते, तर टिळकांचा सरकारी हस्तक्षेपाला विरोध होता. टिळकांनी बालविवाह व्यवस्थेचे कधीच समर्थन केले नाही. उलट या व्यवस्थेचे अनिष्ट परिणाम होत असल्याचे मान्य केले. सामाजिक सुधारणांपेक्षा राजकीय प्रगतीला प्राधान्य द्यायला हवे असा विचार टिळक करीत होते. सामाजिक सुधारणांसाठी सरकारी कायदा करण्याला त्यांचा विरोध होता. राजकीय सुधारणा झाल्याखेरीज आमची सामाजिक स्थिती सुधारायची नाही असे त्यांचे मत होते.

डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या संस्थेतील अंतर्गत भांडण, फाटाफूट यातूनच त्यांचे रस्ते वेगळे झाले. वेगळ्या झालेल्या या रस्त्यांना वैचारिक भांडणाचे रूप आले. आगरकरांना राजकीय सुधारणांना विरोध नव्हता आणि टिळकांचा सामाजिक सुधारणेसाठी विरोध नव्हता. प्रश्न होता ’अग्रक्रम कशाला द्यायचा’ याचा. त्यांचे वाद अत्यंत कटुतेच्या टोकाला पोचले; पण त्यांच्या अंतर्यामी परस्परविषयाची ओढ आणि ते एकमेकांचे महत्व ओळखून होते. सामाजिक-धार्मिक सुधारणावरून दोघांची जुंपली असली तरी संघर्षकाळात सुद्धा राजकीय व आर्थिक विचारांवरून त्यांच्यात मतभेद झाल्याचे आढळत नाही. समाजसुधारक आगरकर जहाल राष्ट्रवादीसुद्धा होते, म्हणूनच खुद्द टिळकांनीच त्यांना ’पक्के स्वराज्यवादी’ म्हणून संबोधिले आहे. ’विवेकशील राष्ट्रवाद’ असे आगरकरांच्या राष्ट्रवादाचे समर्पक वर्णन आचार्य जावडेकरांनी केले आहे.

1894 पासून मात्र टिळक-आगरकरांची परस्पर विषयांची आंतरिक ओढ वाढू लागली. त्याच वर्षी टिळक निवडणूक लढवून मुंबई विद्यापीठाचे ’फेलो’ झाले, तर सरकारने आगरकरांची ’फेलो’ म्हणून नियुक्ती केली. टिळकांनी लगेच पत्राद्वारे आगरकरांचे अभिनंदन केले. आगरकरांनी दिनांक 04 फेब्रुवारी 1894 ला जे पत्र लिहिले, त्यात ते म्हणतात – ’सरकारने मला जो सन्मान बहाल केला, त्याबद्दल तुम्ही पत्र पाठवून माझे अभिनंदन केलेत. मी तुमचा अत्यंत आभारी आहे. तुम्ही जाहीर निवडणूक जिंकून ’फेलो’ पद मिळवले आहे. या तुमच्या यशाबद्दल तुमचे अभिनंदन करण्यास माझ्याजवळ अधिक सबळ कारण आहे. या नंतर अनुक्रमे ’सुधारक’ व ’केसरी’तही परस्परांचे जाहीर अभिनंदन दोघांनी केल्याचे दिसते.

आगरकरांची प्रकृती बिघडल्याचे कळताच टिळक सिंहगडावरून पुण्यात आले. तेव्हा त्याच दिवशी म्हणजे रविवार दिनांक 16 जून 1895 ला त्यांच्या घरी भेटण्यास गेले. आगरकरांच्या मृत्यूच्या आदल्या दिवशी अशी भेट व्हावी हा योगायोग विलक्षण होता. आगरकरांच्या मृत्यूवर टिळकांनी दोन लेख लिहिले. पहिला लेख लगेचच म्हणजे मंगळवार दिनांक 18 जून 1895 रोजी (शीर्षक – डेक्कन एज्युकेशन सोसायटीतील पाचवा मृत्यू – प्रि. गोपाळ गणेश आगरकर) तर दुसरा लेख मुंबईत आगरकरांच्या एकविसाव्या स्मृतीदिन पाळण्यात आला, तेव्हा म्हणजे मंगळवार 04 जुलै 1916 रोजी. पहिला लेख शोकाकुल मित्राच्या भूमिकेतून होता, तर दुसरा लेख आगरकरांच्या कार्याचा आढावा घेणारा होता. मंगळवार दिनांक 18 जून 1895 ला दै. ’केसरी’मध्ये लिहिलेल्या लेखात टिळक म्हणतात – ’1879 पासून त्यांचा व केसरीच्या एडिटरचा जो निकट संबंध जडला होता, त्यामुळे त्यांचा मृत्युलेख लिहिण्याचे दुर्घट काम, आपल्या हातून कसे काय निभावेल याची केसरीस बरीचशी शंका वाटत आहे…. प्रथमतः दृढनिश्चयाने त्यांनी व आम्ही काही विशिष्ट लोकोपयोगी कार्य करण्याचे मनात आणले व त्यानंतर ती कार्य सिद्धीस नेण्याकरिता एकदिलाने घरी, दारी किंबहुना कारागृहीं जे बेत व उद्योग केले त्यांचे तीव्र स्मरण पुनःपुन्हा जागृत होऊन आमची बुद्धी व लेखणी गोंधळून जाते’….. टिळक पुढे म्हणतात ’हाती घेतलेला विषय मार्मिक आणि जोरदार रीतीने प्रतिपादन करण्याची गोपाळरावांनी शैली केसरीच्या वाचकांस पूर्णपणे माहित आहे…… देशी वृत्तपत्रास हल्ली जर काही महत्व आले असेल तर ते बर्‍याच अंशी रा.रा.आगरकरांच्या बुद्धिमत्तेचे व मार्मिक लेखांचे फळ होय असे कोणीही कबूल करील’. ध्येयाचा निश्चय टिळक-आगरकरांनी ज्या समरसतेने केला त्याचे प्रतिबिंब या उतार्‍यात आहे आणि एकट्या अगरकरांशी टिळकांनी देशसेवेच्या ध्येयाचे खलबत इतरांपेक्षा अधिक विश्वासाने का केले हा सुद्धा प्रश्न सुटतो. आगरकरांच्या मृत्यूमुळे महाराष्ट्राची, मराठी भाषेची व सर्वाधिक डेक्कन एज्युकेशन सोसायटीची हानी कशी झाली याचा उल्लेख करून टिळकांनी हा लेख संपविला आहे.

आगरकरांच्या पत्नी यशोदाबाईंच्या आठवणींमध्ये टिळक-आगरकरांच्या अखेरच्या भेटीची आठवण समाविष्ट आहे. त्या म्हणतात – ’मरणसमयी त्यांना सुखाने मरण यावे यासाठी त्यांनी एकच इच्छा ठेवली होती आणि ती म्हणजे टिळकांशी झालेले वितुष्ट नाहीसे करणे. ’टिळकांशी वाकडेपणा ठेवून मला शांतपणे मरण यायचं नाही’. हे मरावयाच्या अगोदर टिळक आमच्याकडे आले, भेटले, बसले, कितीतरी बोलले आणि मगच हे गेले. त्यांच्या इच्छेप्रमाणे मरताना टिळकांशी मैत्री करून ते गेले’.

प्रत्यक्षात स्वतःच्या मोठ्या मुलाचा एकाकी मृत्यू झाल्यावर टिळक रडले नाहीत, काळ्या पाण्याची शिक्षा झाली तरी त्यांच्या मनाचा धीर सुटला नाही; पण आगरकर वारले तेव्हा मात्र टिळक रडले. आगरकरांवर मृत्युलेख लेखकाला सांगताना इतका वेळ आवरलेले अश्रू त्यांच्या डोळ्यातून घळाघळा ओघळू लागले. सर्वसाधारण केसरीतील अग्रलेख लिहून घ्यायला टिळकांना फक्त अर्धा तास लागत असे; परंतु आगरकरांवरचा मृत्युलेख लिहिताना मात्र त्यांना दोन तास लागले आणि स्वतःच्या भावनांना आवर घालण्यासाठी त्यांना वेळोवेळी थांबावे लागत होते. आगरकरांच्या मृत्यूने एक जहाल उदारमतवादी युगाचा अंत झाला. नि:स्वार्थपणे लोकोपयोगी कामासाठी स्वतःला पूर्णपणे वाहून घेतल्यामुळे आगरकर थोर ठरतात असे टिळकांनी नमूद केले आहे.

लोकमान्य टिळकांनी आपल्या राष्ट्राचे, आपल्या लोकांचे प्राचीन वैभव व थोरवी ही जगाच्या निर्दशनास आणण्याचा प्रयत्न केला व आपल्या लोकांची व राष्ट्राची उन्नती व्हावी म्हणून जन्मभर दगदग व कष्ट सोसले. आगरकरांनी आपली बुद्धिमत्ता समाज सुधारणेकडे म्हणजे विधवाविवाह, बालविवाह, जातीभेद वगैरे मुद्द्यांकडे वळवली. आगरकरांनी स्वतःच्या सुखाचा विचार न करता समाजामध्ये पीडित विधवांच्या दुःख परिमार्जनार्थ स्वार्थत्यागपूर्वक लेखन केले. टिळकांनी अखिल राष्ट्राच्या दुःख परिमार्जनार्थ स्वसुखाकडे दुर्लक्ष केले. स्वसुखाविषयी उदासीन राहून दुसर्‍याच्या कल्याणाकरिता झटायचे हाच दोघांचा कृतसंकल्प होता. आगरकर अल्पवयात वारल्यामुळे त्यांना हयातीत व मरणानंतर आजपर्यंत त्यांच्या योग्यतेप्रमाणे मान मिळाल्याचे आढळत नाही. टिळक-आगरकर एकमेकांपासून विभक्त झाले खरे; पण त्यातून देशभक्ती व प्रगतीच्या दोन वाटा खुल्या झाल्या.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा