नितीन गडकरी यांची वस्तु संग्रहालय प्रशासनाला सुचना
पुणे : वस्तु संग्रहालय हे देशाचे वैभव आहे. हे वैभव कायम राखण्यासाठी देशभरात ज्या ज्या दुर्मिळ वस्तु आहेत. त्याचा इथे समावेश असावा. प्रत्यक्ष वस्तू न मिळाल्यास छायाचित्र स्वरूपात त्याचा संग्रह उपलब्ध करावा. त्यातून संस्कृती व तंत्रज्ञानाचा मिलाप साधला जाईल, अशी सूचना केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केली असल्याची माहिती राजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालयाचे संचालक सुधन्वा रानडे यांनी दिली.
गडकरी यांनी शुक्रवारी सायंकाळी राजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालयाला सदिच्छा भेट दिली. वस्तु संग्रहालयातील वस्तुंची पाहणी करून त्याविषयी माहिती जाणून घेतली. त्यानंतर वस्तुसंग्रहालय प्रशासनाने नव्या जागेतील वस्तुसंग्रहालय स्थलांतराबाबतचा आराखडा गडकरी यांना दाखविला. त्यानंतर गडकरी यांनी वस्तु संग्रहलयाल प्रशासनाला काही सूचना केल्या. वस्तु संग्रहालयाच्या आराखड्याला महानगरपालिका, राज्य शासन आणि केंद्र सरकारची मदत मिळविण्यासाठी आरखडा कसा तयार करावा? त्याचे स्वरूप कसे असावे याबाबतही गडकरी यांनी मार्गदर्शन केले.
गडकरी यांनी वस्तु संग्रहालयातील तीन्ही मजल्यावरील गॅलरी, दुर्मिळ वस्तुंची माहिती घेतली. तसेच वस्तू संग्रहालयामागची पार्श्वभूमी जाणून घेतली. वस्तुसंग्रहालय, त्यातील वस्तू, त्याची वैशिष्ट्यपूर्ण रचना, वस्तूंची माहिती, वस्तूंच्या रचनेनुसार करण्यात आलेली प्रकाश व्यवस्था आदी सर्व पाहून गडकरी वस्तु संग्रहालयाच्या प्रेमात पडले.
वस्तु संग्रहालयाचे वैभव अभिमानास्पद
राजा दिनकर केळकर वस्तू संग्रहालय उत्तम आहे. यातील वस्तूंचे सौंदर्य अद्भूत आहे. वस्तु संग्रहालयाचे वैभव अभिमानास्पद आहे. या वस्तु संग्रहालयाला भेट देण्याची खुप दिवसांपासूनची इच्छा होती. मात्र योग जुळत नव्हता. आज भेटीचा योग जुळून आला. म्हणून सदिच्छा भेट दिली. या वस्तू संग्रहालयाचे वैभव अफाट आहे. – नितीन गडकरी, केंद्रीय मंत्री.
नव्या वस्तु संग्रहालयासाठी आर्थिक साह्य हवे
बावधन येथे वस्तु संग्रहालयासाठी 6 एकर जागा राज्य शासनाने दिली आहे. तेथे म्युझिअम सिटी व्हावी, अशी आमची इच्छा आहे. मात्र त्यासाठी महापालिका, राज्य शासन, केंद्र सरकार, शहरातील राजकीय व्यक्ती आणि उद्योजकांच्या भरीव आर्थिक साह्याची गरज आहे. नव्या वस्तु संग्रहालयाचा आराखडा योत्या दोन महिन्यांत तयार करण्यात येणार आहे. मात्र हे वस्तु संग्रहालय जागतिक दर्जाचे होण्यासाठी आर्थिक पाठबळाची गरज आहे. – सुधन्वा रानडे, संचालक, राजा दिनकर केळकर वस्तु संग्रहालय.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा