‘आप’ सारखा पक्ष तटस्थ राहिला तरी राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीत विरोधकांचा पराभव होऊ शकतो. विरोधकांतील दुफळी आणि छोटे प्रादेशिक पक्ष यांच्या मदतीने भाजप आपला उमेदवार निवडून आणू शकेल.

आगामी राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सामयिक उमेदवाराची निवड करण्यासाठी किंवा त्यावर किमान विचार करण्यासाठी झालेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीला प्रारंभीच ग्रहण लागले. तेलंगण राष्ट्रीय समिती, वाय एस आर काँग्रेस, ओवैसी यांचा एआयएमआयएम, अकाली दल हे पक्ष काँग्रेसला विरोध म्हणून बैठकीला आले नाहीत. बिजू जनता दल आणि ‘आप’ का उपस्थित नव्हते ते समजलेले नाही. आणखीही काही छोट्या पक्षांनी दूर राहणे पसंत केले. तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि पश्‍चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी विरोधकांचे सामयिक उमेदवार या नात्याने राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नाव पुढे केले होते; पण पवार यांनी त्यास नकार दिला आहे. मधल्या काळात सरकारतर्फे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी जवळपास सर्व विरोधी पक्षांच्या नेत्यांशी दूरध्वनीने संपर्क साधून पाठिंब्याचे आवाहन केले. दोन्ही बाजूंकडून उमेदवार जाहीर झालेला नाही. कुस्तीत जशी प्रतिस्पर्ध्याच्या ताकदीचा अंदाज घेण्यासाठी ’खडाखडी’ होत असते तसाच हा प्रकार आहे. राष्ट्रपतिपदाची निवडणूक हे निमित्त आहे, सर्वांचे खरे लक्ष आहे ते पुढील लोकसभा निवडणुकीकडे. भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यास विरोधी पक्ष एकत्र येऊ शकतात की नाही हा मुद्दा महत्त्वाचा आहे.

थोडा फरकही मोठा

मागील निवडणुकीत मोदी सरकारने रामनाथ कोविंद यांचे नाव पुढे करून धक्का तंत्र वापरले. आताही आपल्या उमेदवाराचे नाव भाजपने गुलदस्त्यात ठेवले आहे. भाजपच्या विरोधात अनेक पक्ष असले तरी त्यांच्यात एकवाक्यता नाही. प्रत्येक नेत्याची वैयक्तिक महत्त्वाकांक्षा हा मोठा अडथळा आहे. पश्‍चिम बंगालमध्ये भाजपला धूळ चारल्याने ममतादीदी यांचा जोर वाढला आहे. तेलंगण हे आपले स्वतंत्र राज्य असल्याची भावना असल्याने केसी राव यांना कोणी प्रतिस्पर्धी नको आहे. आंध्राचे मुख्यमंत्री जगनमोहन रेड्डी मुख्यत: काँग्रेसच्या विरोधात आहेत. तेही आंध्र प्रदेशाला स्वत:चे राज्य समजतात. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचीही स्थिती फार वेगळी नाही. पंजाबात मोठा विजय मिळाल्याने त्यांचा नूर बदलला आहे. मेहबूबा मुफ्ती यांचा ’पीडीपी’ किंवा अब्दुल्ला यांचा नॅशनल कॉन्फरन्स हे नगण्य आहेत. काँग्रेस हा जरी राष्ट्रीय पक्ष असला तरी त्याची शक्ती क्षीण झाली आहे. आपले म्हणणे इतरांकडून मान्य करून घेण्याची या पक्षाची स्थिती नाही. काँग्रेसने म्हणूनच कोणतेही नाव सुचवलेले नाही. सर्व पक्ष जो उमेदवार ठरवतील त्यास काँग्रेसची मान्यता असेल असे मल्लिकार्जुन खर्गे यांनी सूचित केले आहे. घटना व धर्मनिरपेक्षता यांना महत्त्व देणारा उमेदवार विरोधकांना हवा आहे. अशी स्वतंत्र विचारांची व्यक्ती मोदी-शहा यांना मान्य होणार नाही. डॉ. फारुख अब्दुल्ला आणि गोपाळ कृष्ण गांधी ही नावे सध्या विरोधी गटातर्फे चर्चेत आहेत. डॉ. अब्दुल्ला काश्मीरचे आहेत व मुस्लिम आहेत. समजा ते उमेदवार झालेच व त्यांना भाजपने विरोध केल्यास भाजप मुस्लिम विरोधी असल्याचे स्पष्ट होईल. गोपाळकृष्ण गांधी पूर्वी पश्‍चिम बंगालचे राज्यपाल होते. प्रशासकीय अनुभव त्यांच्याकडे आहे. ते महात्मा गांधी यांचे नातू आहेत ही त्यांची मोठी जमेची बाजू आहे. त्यांना विरोध करणे म्हणजे महात्मा गांधी यांचा अवमान करण्यासारखे होईल; पण त्यांनी अजून होकार दिलेला नाही. अलीकडच्या पाच विधानसभा निवडणुकांमुळे भाजपच्या आमदारांची संख्या घटली आहे. आपला उमेदवार विजयी करण्यासाठी आवश्यक असलेल्या मतांपेक्षा सुमारे 13 हजार मते त्यांच्याकडे कमी आहेत. गेल्या निवडणुकीत वायएसआर काँग्रेस, बिजू जनता दल यांनी भाजपला मदत केली होती. बिहारमधील संयुक्त जनता दलाची भूमिकाही अजून स्पष्ट नाही. एखादा-दुसरा आमदार किंवा खासदार असलेला छोटा पक्षदेखील विरोधी आघाडीत आला तरच विरोधकांना विजयाची आशा करता येईल. सत्ता आणि पैसा यांच्या बळावर अशा छोट्यांना, प्रादेशिक पक्षांना भाजप आपल्याकडे वळवू शकतो. सध्याची, ‘सर्वमान्य उमेदवाराच्या शोधात 17 पक्ष’ ही अवस्था फार आशादायक नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा