मुख्यमंत्र्यांचे गौरवोद्गार
मुंबई : ‘मुंबई समाचार’ आणि ‘केसरी’ ही वृत्तपत्रे इतिहासाची केवळ साक्षीदार नसून त्यांच्याकडून आज सुरू असलेले कार्यदेखील ऐतिहासिक आहे, असे गौरवोद्गार मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकतेच काढले.
मुंबई समाचार वृत्तपत्राचा २०० वा वर्षपूर्ती सोहळा मुंबईत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झाला. या सोहळ्यात ठाकरे बोलत होते.ठाकरे म्हणाले, गुजराती समाज महाराष्ट्रात दुधात साखर विरघळ्याप्रमाणे राहत आहेत. मुंबईत गुजराती वृत्तपत्र 200 वर्षे पूर्ण करत असल्याचा अभिमान वाटतो. त्याच प्रमाणे महाराष्ट्रात लोकमान्य टिळक यांचे केसरी वृत्तपत्र 141 वर्षे जनजागृतीचे कार्य अखंड करत आहे. काही वृत्तपत्रे चळवळीत जन्म घेतात आणि चळवळीनंतर बंद होतात, असे सांगताना मुख्यमंत्र्यांनी वृत्तपत्र चालविणे किती अवघड आहे, हे सांगतानाच ‘केसरी’ आणि ‘मुंबई समाचार’चे कौतुक केले. गुजराती पत्रकारिता स्वातंत्र्याच्या लढ्यात महत्त्वाची भूमिका पार पाडत होती. तेव्हा ‘केसरी’ने देखील त्याचप्रमाणे कार्य केले आहे, असे गौरवोद्गार त्यांनी काढले.
ते म्हणाले, ब्रिटिशांना केसरीने ‘सळो की पळो’ करून सोडले. राजभवनात ज्या प्रमाणे ‘क्रांति गाथा’ दालनाची निर्मिती केली. त्याप्रमाणेच मुंबई समाचार आणि दुर्मिळ वृत्तपत्रांच्या इतिहासांचे एखादे दालन निर्माण करावे.