पुणे : मध्य महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. मात्र अद्याप मोठा पाऊस झाला नसल्याने यावेळी मान्सूनने चिंता वाढविली आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात शनिवारी मान्सून सक्रीय होणार आहे. त्यानंतर सोमवार ते बुधवार या तीन दिवसांत जोरदार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने गुरूवारी वर्तविला.
दरवर्षी मान्सून पुण्यात दाखल झाल्यानंतर जोरदार पाववाचे आगमन होते. मात्र यावेळी मान्सून दाखल होऊन काही दिवसांचा कालावधी उलटला, तरी मोठा पाऊस झाला नाही. केवळ ढगाळ वातावरण आहे. आधुन मधून केवळ पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. येत्या सोमवारपासून शहरासह जिल्ह्यातील घाट क्षेत्रात मुसलधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे मोठ्या पावसासाठी पुणेकरांना आणखी तीन दिवसांची प्रतिक्षा करावी लागणार आहे.
मान्सूनचे शहरात आगमन झाल्यापासून शहर आणि परिसरात ढगाळ वातावरण कायम आहे. शुक्रवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण असणार आहे. सायंकाळी मात्र हलक्या पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. काल शहरात 34.5 अंश कमाल, तर 23.5 अंश किमान तपमानाची नोंद झाली. ढगाळ वातावरण आणि पावसामुळे शहरातील तपमान काही काळ स्थिर राहणार आहे.
कोकण, गोव्यात मुसळधार
मान्सूनचे आगमन झाले असले, तरी राज्यात अद्याप पाऊस सक्रीय झाला नाही. राज्यात पावसासाठी पोषक स्थिती निर्माण होत आहे. शनिवार पासून कोकण, गोव्यात मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हलका ते मध्यम पाऊस असेल. विदर्भात मात्र मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात पाऊस पडणार आहे. मध्य महाराष्ट्रात ठिकठिकाणी सोमवारपासून मुसळधार ते जोरदार पावसाचाला सुरूवात होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले.
मान्सूनने महाराष्ट्र व्यापला
राज्यात मान्सूनचे आगमन झाले असले, तरी मोठ्या पावसाने मात्र दडी मारली आहे. काही भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. अशा स्थितीत गुरूवारी संपूर्ण महाराष्ट्र मान्सूनने व्यापला असल्याची घोषणा हवामान विभागाने केली आहे. मान्सून आगमनाचे निकष पूर्ण करताच मान्सूनने राज्य कसे व्यापले, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. राज्य मान्सूनने व्यापले आहे. मात्र येत्या दोन ते तीन दिवसांत राज्यात जोरदार पावसाला सुरूवात होणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा