मुंबई : महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीच्या 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यामुळे राज्यसभेच्या निवडणुकीप्रमाणे विधान परिषदेच्या निवडणुकीची चुरस वाढणार हे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस त्यांचा दुसरा उमेदवार मागे घेईल अशा चर्चा सुरू होत्या. मात्र, काँग्रेसने दुसरा उमेदवार रिंगणात कायम ठेवल्याने निवडणूक होणार असल्याचे स्पष्ट झाले. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधला. विधान परिषदेचा कोटा 26 मतांचा आहे. महाविकास आघाडीतील सर्व पक्ष, अपक्ष आम्हाला मतदान करतील, असा विश्वास बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमच्यावर उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी सांगत नव्हते, तर आम्हाला मदत करण्याबाबत चर्चा करत होते, असे थोरात यांनी म्हटले. महाविकास आघाडीत कसल्याही प्रकारची बिघाडी नाही. विधान परिषदेसाठी महाविकास आघाडीचे 6 उमेदवार विजयी होतील, असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

भाजपकडून विधान परिषदेसाठी प्रविण दरेकर, राम शिंदे, प्रसाद लाड, उमा खापरे आणि श्रीकांत भारतीय यांना उमेदवारी देण्यात आली आहे. शिवसेनेने विधान परिषद निवडणुकीसाठी सचिन अहिर व आमश्या पाडवी यांना उमदेवारी दिली आहे. तर, राष्ट्रवादी काँग्रेसने एकनाथ खडसे व रामराजे नाईक निंबाळकर यांना उमेदवारी दिली आहे. काँग्रेसने भाई जगताप आणि चंद्रकांत हंडोरे यांना उमेदवारी दिली आहे. आता 10 जागांसाठी 11 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात असल्याने निवडणुकीतील चुरस वाढली आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा