पुणे : रेल्वे गाड्यांमध्ये गॅस अथवा आधुनिक चुलींचा वापर करण्यास रेल्वेने बंदी घातली आहे. त्यामुळे पॅट्रीकार व डायनिंग कार असणार्‍या गाड्यांतही स्थानकावरून अन्न तसेच चहा, कॉफी घेवून जावे लागणार आहे. त्यामुळे रेल्वे गाड्यांत आता प्रवाशांना शिळ्या अन्नावर आपली भूक भागवावी लागणार आहे.
भारतीय रेल्वे मंत्रालय, रेल्वे बोर्ड आणि रेल्वेच्या उच्चस्तरीय समितीने रेल्वेतील आगीच्या घटनांना आळा घालण्यासाठी रेल्वे गाड्यांमध्ये गॅसच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे पॅट्रीकार आणि डायनिंग कारमध्ये अन्न पुरविण्याचे कंत्राट ज्यांनी घेतले आहे. त्यांना विविध प्रकारचे अन्न, चहा, कॉफी गाडी स्थानकातून निघतानाच सोबत घ्यावे लागणार आहे. विशेषत: यापुढे धावत्या गाडीत अन्न शिजविता येणार नसल्यामुळे प्रवाशांना शिळेच अन्न खावे लागणार आहे.
साधा चहा, कॉफीदेखील पॅट्रीकार तसेच डायनिंग कारमध्ये तयार करता येणार नसल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. तसेच पॅट्रीकार, डायनिंग कारचे कंत्राट घेणार्‍यांना गाडीतील स्वयंपाकाचे गॅस काढून टाकण्याचे आदेश देण्यात आले आहेत. या निर्णयामुळे लांब पल्ल्याचा प्रवास करणार्‍या प्रवाशांना गरम अन्न मिळणार नसून शिळेच अन्न मिळणार आहे. पॅट्रीकारचे कंत्राट घेणार्‍यांना एक तर गाडी निघताना स्थानकावरूनच अन्न घ्यावे लागेल. अथवा ज्या रेल्वे स्थानकावर गाडी थांबेल तेथून अन्न घेण्याची व्यवस्था करावी लागणार आहे. या रेल्वे मंत्रालयाच्या निर्णयावर मात्र रेल्वे प्रवासी आणि रेल्वे प्रवासी संघटनांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
डेक्कन क्विनमधील गॅस काढला
पुणे-मुंबई प्रवास करणार्‍या प्रवाशांच्या लाडक्या डेक्कन क्विनमधील डायनिंग कारमधला गॅस काढण्यात आला आहे. डायनिंग कार ही डेक्कन क्विनची ओळख आहे. मात्र या डायनिंग कारमध्ये अन्न शिजविण्यास बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे इतर गाड्याप्रमाणे या गाडीत थंड झालेले अन्नपदार्थ प्रवाशांना मिळत आहेत. डायनिंग कारमध्ये पुणे रेल्वे स्थानकातूनच अन्न घेवून जावे लागत आहे. त्यामुळे डायनिंग कारमध्ये जाणारे प्रवाशी नाराज झाले आहेत.
सेवा देणे ही तर रेल्वेची जबाबदारी
डेक्कन क्विनच्या डायनिंग कारमधील गॅस काढून टाकण्यात आला आहे. त्यामुळे डायनिंग कारमध्ये अन्न पुरविण्याचे टेडर घेणार्‍यांना स्थानकावरून अन्न घेऊन जावे लागत आहे. मात्र बर्‍याच वेळा गाड्या उशीराने धावतात. तांत्रिक कारणामुळे मध्येच थांबतात. त्यामुळे अन्नाविना प्रवाशांचे हाल होतील. अन्न, पाणी देणे ही तर रेल्वेची जबाबदारी, डायनिंग कारमध्ये गरम आणि ताजे अन्न मिळणार नसेल, तर तेथील शिळे अन्नच खाण्याऐवजी प्रवासी घरूनच अन्न घेऊन येतील. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय होईल. – हर्षा शहा, अध्यक्ष, रेल्वे प्रवासी संघ.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा