पिंपरी : श्री क्षेत्र देहू येथे आज मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांचे आगमन होत आहे. शिळा मंदिराच्या लोकार्पणासाठी पंतप्रधान येथे येत असून त्यांच्या स्वागताची जय्यत तयारी देहू संस्थान, जिल्हा प्रशासन यांच्या वतीने झाली आहे.

देहू येथील तयारीचा आढावा घेताना भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील

मंदिराच्या लोकार्पणानंतर पंतप्रधान मोदी उपस्थित वारकर्‍यांशी संवाद साधणार आहेत. त्यासाठी देहूगाव जवळ मोकळ्या जागेत सुमारे ४० हजार श्रोते बसू शकतील असा भव्य सभामंडप उभारण्यात आला आहे. पंतप्रधान देहूमध्ये ज्या ज्या ठिकाणी जाणार आहेत त्या ठिकाणी सोमवार सायंकाळपासूनच पोलीस बंदोबस्त करण्यात आला आहे. जिल्हा प्रशासनाचे आणि पोलीसखात्याचे वरिष्ठ अधिकारी पंतप्रधानांच्या दौर्‍यामध्ये सुरक्षेच्या बाबतीत कोणतीही कसूर राहू नये यासाठी आटोकाट प्रयत्न करत आहेत. भाजपचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील आणि माजी मंत्री बाळा भेगडे यांनीही सोमवारी देहूगाव येथे जाऊन तयारीचा आढावा घेतला.

देहू येथील सभामंडप

पंतप्रधानांच्या दौर्‍यामुळे राज्यभरात ’अति सावधगिरीचा इशारा’ देण्यात आला आहे. पुणे जिल्ह्यात प्रवेश करणार्‍या वाहनांवर पोलिसांनी कडक लक्ष ठेवले आहे. ठिकठिकाणी नाकाबंदी करण्यात आली असून संशयास्पद वाहनांची तपासणी केली जात आहे.

देहू येथील सभामंडपात महत्वाच्या व्यक्तींना बसण्यासाठी केलेली व्यवस्था

पंतप्रधानांचे मंगळवारी सकाळी विमानाने पुणे येथे आगमन होणार असून त्यानंतर दुपारी एक ते दोन वाजण्याच्या दरम्यान हेलिकॉप्टरने ते देहू येथे पोहोचणार आहेत. देहूगाव येथे उभारलेल्या हेलिपॅडवर पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आगमन होईल. वारकर्‍याच्या वेशात पंतप्रधान इंद्रायणी तीरावरील विठ्ठलमंदिरात जाऊन श्री विठ्ठल रुक्मिणीचे दर्शन घेतील. त्यानंतर शिळामंदिराच्या लोकार्पणाचा कार्यक्रम पार पडणार आहे. या मंदिराची पायाभरणी प्रतिभा पाटील यांनी राष्ट्रपती असताना केली होती.

देहूमध्ये पोलीस बंदोबस्त

पंतप्रधानांच्या दौर्‍याच्या पार्श्‍वभूमीवर पोलिसांनी सुरू केलेल्या तपासणी सत्रामध्ये पुण्यात एका भंगार विक्रेत्याकडे काडतुसे सापडली. तसेच शहराच्या मध्यवर्ती भागात एका सदनिकेत संशयास्पदरित्या स्फोट झाला. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा अधिकच सतर्क आहेत.

ही पगडी पुण्यातील मुरूडकर झेंडेवाले यांनी तयार केली आहे

पगडी विशेष का आहे?

देहू संस्थानतर्फे पंतप्रधानांचा पगडी आणि उपरणे देऊन सन्मान केला जाणार आहे. ही पगडी पुण्यातील मुरूडकर झेंडेवाले यांनी तयार केली आहे.सुरुवातीला या पगडीवर ‘भले तरी देऊ कासेची लंगोटी, नाठाळाचे माथी हाणू काठी’ या ओळी होत्या. आता या पगडीवर ‘विष्णूमय जग वैष्णवांचा धर्म, भेदाभेद भ्रम अमंगळ’ अशा ओळी लिहिल्या आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा