पारनेर (वार्ताहर) : शिवसेनेशी माझे वैर नाही. माझ्या खासदारकीत शिवसेनेचा, शिवसैनिकांचा 50 टक्के वाटा आहे हे आपण विसरलो नाही. जिल्ह्यातील भाजपचा प्रत्येक कार्यकर्ता शिवसैनिकांशी एकनिष्ठ राहील. शिवसैनिकांची साथ आपण सोडणार नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कारवाई केली, तरी मला त्याची पर्वा नाही, असे खळबळजनक वक्तव्य खासदार सुजय विखे यांनी केले.

शिवसेनेशी सलगी दाखवणारी वक्तव्ये केल्याने आगामी जिल्हा परिषदेची निवडणूक पारनेर तालुक्यात शिवसेनेला बरोबर घेत लढवण्याची विखेंची खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. पारनेर तालुक्यातील रांजणगाव मशीद येथे आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.

विखे म्हणाले, जिल्ह्याचे राजकारण वेगळे आहे. त्यामुळे सुसंगत धोरण घ्यावे लागणार आहे. वरचे राजकारण, युती आघाडी काहीही असो, मी आणि माझे कार्यकर्ते कधीही शिवसैनिकांची साथ सोडणार नाही. आम्ही नेहमीच शिवसेनेशी एकनिष्ठ राहू. यामुळे मोदी, फडणवीसांनी माझ्यावर कारवाई केली, तरी मला त्याची पर्वा नाही. माझ्यासारखा उघड, स्पष्ट आणि सत्य बोलणारा दुसरा खासदार नाही, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

राष्ट्रवादीकडून शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप करीत शिवसेनेने लवकरात लवकर राष्ट्रवादीची साथ सोडावी, असे आवाहन त्यांनी केले. राष्ट्रवादीकडून शिवसेनेला संपवण्याचे प्रयत्न सुरू असल्याचा प्रत्यय राज्यसभा निवडणुकीत आला असून, राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांनी आपल्या उमेदवारांची मते सुरक्षित करून घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यसभेची निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. मात्र, पवारांच्या डावपेचामुळे शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव झाला, शिवसेनेची नाचक्की झाली. ठाकरे यांची मान खाली गेली.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा