नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरून लष्कराचे दोन जवान बेपत्ता झाले आहेत. हरेंद्र नेगी आणि प्रकाश सिंह राणा अशी या जवानांची नावे आहेत. दि. 28 मेपासून हे दोन्ही जवान बेपत्ता आहेत. याबाबतची माहिती माहिती लष्कराच्या अधिकार्‍यांनी त्यांच्या कुटुंबीयांना दिल्याने दोघांचे कुटुंबीय चिंतेत आहेत. या प्रकरणी लष्कराने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती प्रसिद्ध केलेली नाही.
मूळचे रुद्रप्रयाग जिल्ह्यातील उखीमठचे रहिवासी असलेले राणा 7 व्या गढवाल रायफल्सचे जवान आहेत. अरुणाचल प्रदेशातील भारत-चीन सीमेवरील ठकला सीमेवर तैनात होते. गेल्या 13 दिवसांपासून ते बेपत्ता आहेत. यामुळे त्यांची पत्नी ममता, दोन मुले अनुज आणि अनामिका चिंतेत आहेत. अनुज 10 वर्षांचा असून अनामिका 7 वर्षांची आहे. प्रकाश सिंह राणा 28 मेपासून बेपत्ता असल्याची माहिती लष्कराकडून आम्हाला 29 मे रोजी देण्यात आल्याचे त्यांच्या पत्नी ममता यांनी सांगितले. यानंतर लष्कराच्या अधिकार्‍यांनी 9 जूनला ममता यांना दुसर्‍यांदा फोन केला. बेपत्ता झालेले दोन्ही जवान नदीत बुडाले असावेत, अशी भीती त्यांच्याकडून व्यक्त करण्यात आली.
सहसपूर मतदारसंघाचे भाजप आमदार सहदेव सिंह पुंडिर यांनी सैनिकी वसाहतीत जाऊन राणा यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. याप्रकरणी संरक्षण राज्यमंत्री अजय भट्ट यांच्याशी संवाद साधला असून, पूर्णपणे सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी दिले आहे, अशी माहिती पुंडिर यांनी दिली. बेपत्ता जवान राणा यांच्याबद्दलचा संपूर्ण तपशील आपण भट्ट यांनी पाठवल्याचे त्यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा