नवी दिल्ली ः देशात कोरोनाचा धोका सातत्याने वाढत आहे. गेल्या 24 तासांत 8 हजार 582 नवीन कोरोना रुग्णांची वाढ झाली असून, चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे देशातील सक्रिय रुग्णसंख्येत वाढ झाली असून, 44 हजार 513 वर सक्रिय रुग्णसंख्या पोहोचली आहे. सातत्याने रुग्णसंख्येत वाढ होत असून, आरोग्यतज्ज्ञांनी संभाव्य चौथ्या लाटेची भीती व्यक्त केली आहे.
देशात दिवसभरात 4 हजार 435 रुग्णांनी कोरोना विषाणू संसर्गावर मात केली आहे. सध्या एकूण 44 हजार 513 रुग्ण कोरोनावर उपचार घेत आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने यासंदर्भात नवी माहिती जारी केली आहे. देशात आतापर्यंत पाच लाख 24 हजार 761 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्लीत गेल्या 24 तासांत 795 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. दिल्लीतील कोरोना रुग्ण सकारात्मकतेचा दर 4.11 टक्क्यांवर पोहोचला आहे.
चीनमध्ये रुग्णसंख्येत मोठी वाढ
चीनची राजधानी बीजिंगमध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणात रुग्ण आढळून येत असल्याने खळबळ उडाली आहे. येथे कोविड-19 च्या वाढत्या परिस्थितीमुळे नागरिकांच्या समस्या वाढल्या आहेत. बीजिंगमध्ये कोरोनाचा फैलाव वेगाने होत असल्याचा इशारा सरकारी आरोग्य विभागाशी संबंधित अधिकार्यांनी दिला आहे. आरोग्य मंत्रालयाने बीजिंगमधील कोरोना स्फोटाबाबत धोक्याचा इशारा देण्यात आला आहे.