परीक्षेत गुण कमी मिळणे हा विद्यार्थ्याचा अपराध आहे असे समजून विद्यार्थ्याला त्यासाठी दूषणे देण्याची आवश्यकता नाही. उलट विद्यार्थ्याचा नेमका कल काय आहे हे पाहून त्याला पुढील शिक्षणाची दिशा ठरवून देणे हे पालकांनी जबाबदारी म्हणून करायला हवे.

कोरोनाच्या संकटामुळे गेली दोन वर्षे दहावी-बारावीच्या परीक्षा प्रत्यक्ष न घेता अंतर्गत मूल्यमापनाच्या आधारे विद्यार्थ्यांना पुढील वर्गात प्रवेश मिळाले. त्या पार्श्‍वभूमीवर या वर्षी परीक्षा प्रत्यक्ष (ऑफलाईन) घेण्यात आल्या. त्यापैकी बारावीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून, 2020 च्या तुलनेत तो साडेतीन टक्क्यांनी वाढला आहे. 2020 मध्ये निकाल 90.66 टक्के होता तो यावेळी 94.22 टक्के लागला आहे. यातही पुणे-मुंबई पेक्षा कोकण विभाग उजवा ठरला आहे. पुण्या-मुंबईत शिक्षणाच्या अधिक सोयी-सुविधा आहेत, खासगी शिकवणी वर्ग आहेत तरीही कोकण विभागाचा निकाल 97.21 टक्के लागला. पुणे आणि मुंबईपेक्षाही नागपूर, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर या विभागांनी निकालात बाजी मारली आहे. त्यातही मुलींच्या निकालाची टक्केवारी सरस ठरली आहे. अर्थात गेली काही वर्षे मुलांच्या तुलनेत मुलींची कामगिरी नेहमीच सरस ठरत आली आहे. यंदा 95.35 टक्के मुली या परीक्षेत उत्तीर्ण झाल्या तर मुलांच्या उत्तीर्णतेचे प्रमाण 93.29 टक्के आहे. अलीकडेच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या स्पर्धा परीक्षांतही मुलीच चमकल्या आहेत. एकेकाळी दहावी-बारावीच्या परीक्षांच्या निकालाची टक्केवारी 50 किंवा त्यापेक्षा कमी असायची तेव्हा परीक्षेत निम्म्याहून अधिक मुले अनुत्तीर्ण का होतात, याची चर्चा व्हायची आता 90 टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थी उत्तीर्ण होऊन आणि हजारो विद्यार्थ्यांना 90 टक्क्यांपेक्षा अधिक गुण मिळूनही त्यांचे पालक समाधानी नाहीत, असे चित्र पाहायला मिळते. तेव्हा मग खरोखरीच मुलांची गुणवत्ता सुधारली का की शिक्षणाचा दर्जा घसरला का अशी शंका वाटू लागते. यंदा तेरा लाखांहून अधिक विद्यार्थी उत्तीर्ण झाल्याने त्यांच्या पुढील प्रवेशाच्या दृष्टीने विद्यार्थी आणि पालकांच्या मनात चिंता निर्माण होणेही स्वाभाविक म्हणावे लागेल.

अनेक संधी उपलब्ध

साधारणपणे विज्ञान शाखेतून उत्तीर्ण होणार्‍या विद्यार्थ्यांचा कल अभियांत्रिकी किंवा वैद्यकीय शाखेकडे प्रवेश घेण्याचा असतो. याखेरीज वाणिज्य आणि कला शाखेचे विद्यार्थी पारंपरिक अभ्यासक्रमाकडे वळतात. त्यामुळे सर्वच विद्यार्थ्यांना त्यांच्या गुणानुसार आणि आवडीनुसार हव्या त्या महाविद्यालयात प्रवेश मिळणार का याविषयी साशंकता असते. सर्वच विद्यार्थ्यांना प्रवेश मिळतील, कोणीही प्रवेशापासून वंचित राहणार नाही असे शासनाकडून, प्रशासनाकडून सांगण्यात येत असले तरी विद्यार्थ्यांना त्यांच्या निवडी आवडीनुसार प्रवेश मिळतातच असे नाही. या दृष्टीने उत्तीर्णतेची शाखानिहाय स्थिती लक्षात घेऊन त्यांच्या प्रवेशाच्या दृष्टीने नियोजन केले जाण्याची आवश्यकता आहे. पारंपरिक अभ्यासक्रमाचा अपवाद सोडला तर अनेक अभ्यासक्रम हे विद्यार्थ्यांच्या कौशल्य गुणावर प्रवेशासाठी उपलब्ध होऊ शकतात. अभिनय, चित्रपट, नाट्य, संगीत अशा कलागुणांसाठी परीक्षेत मिळालेल्या किंवा मिळविलेल्या गुणांपेक्षा त्याच्या अंगभूत गुणांचा अधिक कस लागत असतो. गेल्या काही वर्षांत अशा विविध अभ्यासक्रमांची भर पडल्याने शैक्षणिक क्षेत्र विस्तारले आहे. त्यामुळे बारावीत कमी गुण मिळाले म्हणून विद्यार्थ्यांना निराश होण्याची आवश्यकता नाही. अर्थात अशा विद्यार्थ्यांनी आपल्या यशा-अपयशामागील कारणांचेही आत्मपरीक्षण करणे योग्य ठरेल. शेवटी दहावी-बारावीच्या परीक्षा याच जीवनातील यशस्वीता मोजण्याचे एकमेव परिमाण नाही, शिक्षण अर्धवट सोडलेले किंवा परीक्षेत कमी गुण मिळालेले अनेक जण जीवनात उत्तमरीत्या यशस्वी झालेले आहे अशीही उदाहरणे पाहायला मिळतात. अशा विद्यार्थ्यांच्या पालकांनीही आपल्या पाल्याला या दृष्टीने समजून घ्यायला हवे. सुदैवाने आजघडीला विविध स्पर्धापरीक्षा, व्यवस्थापन शास्त्रे, कंपनी सेक्रेटरी, चार्टर्ड अकाउंटंट, वैद्यकीय, अभियांत्रिकी अशा विविध अभ्यासक्रमांची दालने खुली आहेत. चांगले गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना त्यापुढील भवितव्य घडविण्याच्या दृष्टीने उत्तम संधी जशा उपलब्ध आहेत, तशाच त्या कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांनादेखील आहेत, हे विसरून चालणार नाही.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा