भाजप आणि महाविकास आघाडीची निवडणूक आयोगाकडे तक्रार; मतपत्रिका दाखवल्याचा आक्षेप
मुंबई : मतदानानंतर केवळ पक्षाच्या अधिकृत प्रतिनिधींना मतपत्रिका दाखवणे अपेक्षित असताना इतरांना मतपत्रिका दाखवल्याच्या भाजप व शिवसेनेने परस्परांविरोधात घेतलेल्या आक्षेपामुळे राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी केंद्रीय निवडणूक आयोगाने रोखली. गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड, महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर व शिवसेनेच्या सुहास कांदे यांच्या विरोधात भाजपाने, तर सुधीर मुनगंटीवार व रवी राणा यांच्या विरोधात शिवसेनेने आक्षेप घेतला. या संदर्भात निर्णय घेण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाची बैठक रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
प्रचंड चुरशीच्या झालेल्या राज्यसभा राज्यसभा निवडणुकीसाठी आज मतदान झाले. सध्या तुरुंगात असलेल्या अनिल देशमुख व नवाब मलिक यांनी मतदानासाठी न्यायालयाकडे परवानगी मागितली होती. परंतु ती अमान्य झाली. यामुळे 285 आमदारांनी शुक्रवारी राज्यसभेसाठी मतदानाचा हक्क बजावला. ही निवडणुक खुल्या मतदानाने होते. मतदान केल्यानंतर राजकीय पक्षाच्या सदस्यांना आपली मतपत्रिका पक्षाने नियुक्त केलेल्या प्रतिनिधींना दाखवावी लागते. त्यानुसार बहुतांश सदस्यांनी मतदान केले. मात्र गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांनी पक्षांच्या नेत्यांबरोबरच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या हातात आपल्या मतपत्रिका दिल्याचा आक्षेप भाजपच्या पराग आळवणी यांनी घेतला. या दोघांनी नियमाचे उल्लंघन केल्यामुळे त्यांची मते बाद करण्याची मागणी त्यांनी केली. शिवसेनेच्या सुहास कांदे यांनी शिवसेनेच्या प्रतिनिधींबरोबरच काँग्रेस व राष्ट्रवादीच्या नेत्यांनाही आपली मतपत्रिका दाखवल्याने त्यांचेही मत बाद करण्याची मागणी भाजपाने केली. निवडणूक निर्णय अधिकार्यांनी हा आक्षेप अमान्य करून हे मत वैध ठरवले. त्यांच्या या निर्णयाविरुद्ध भाजपाने केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली.
भाजपाप्रमाणे शिवसेनेनेही भाजप नेते सुधीर मुनगंटीवार आणि अपक्ष आमदार रवी राणा यांच्या विरोधात आक्षेप घेतला आहे. सुधीर मुनगंटीवार यांनी निवडणूक प्रतिनिधी व्यतिरिक्त इतर व्यक्तीला मतपत्रिका दाखवल्याचा, तर रवी राणा यांनी मतदानानंतर हातातील हनुमानचालिसा फडकावल्याचा आक्षेप घेताना त्यांचे मत बाद करण्याची मागणी शिवसेनेने निवडणूक निर्णय अधिकार्यांकडे केली. मात्र त्यांनी हा आक्षेप अमान्य करून मतदान वैध ठरवले. त्यामुळे शिवसेनेनेही केंद्रीय निवडणूक आयोगाकडे दाद मागितली आहे. परस्परांविरोधात आलेल्या या तक्रारींमुळे आयोगाने मतमोजणीला रात्री उशिरापर्यंत परवानगी दिलेली नव्हती. शिवसेना नेते व निवडणुकीतील उमेदवार संजय राउत यांनी, ईडीचा डाव फसला आता रडीचा डाव सुरू झाला असल्याची टीका करताना भाजपाच्या आक्षेपाची खिल्ली उडवली. तर पराभव समोर दिसत असल्याने भाजप मुद्दाम मतमोजणी रोखण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. यामुळे फारतर पराभव लांबवता येईल, टळणार नाही, असा टोला मुंबई काँग्रेसचे अध्यक्ष भाई जगताप यांनी लगावला.
लढवय्ये आमदारांचे विशेष स्वागत
प्रत्येक मताला महत्व आले होते. त्यामुळे भाजपचे आमदार लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक यांनी पुण्याहून रूग्णवाहिकेतून येउन मतदान केले. शिवसेनेचे आमदार महेंद्र दळवी हे देखील वॉकरच्या सहायाने विधानभवनात आल्याचे चित्र पहायला मिळाले.
राजस्तानमध्ये काँग्रेसचे तिन्ही उमेदवार विजयी
जयपूर : राजस्तानमध्ये राज्यसभेच्या चारपैकी तीन जागा काँग्रेसने जिंकल्या. तर एक जागा भाजपने जिंकली. अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना भाजपने पाठिंबा दिला होता. मात्र, काँग्रेसने त्यांचा पराभव करत तिसरी जागा पटकावली. राजस्तानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी ट्विटरद्वारे ही माहिती दिली. काँग्रेस उमेदवार रणदीप सुरजेवाला, मुकूल वासनिक आणि प्रमोद तिवारी राज्यसभेवर निवडून आले आहेत, असे गेहलोत यांनी ट्विटमध्ये म्हटले.
भाजपचे उमेदवार आणि माजी मंत्री घनश्याम तिवारी हे विजयी झाले असून त्यांना 43 मते मिळाली. अपक्ष उमेदवार सुभाष चंद्रा यांना 30 मतांवर समाधान मानावे लागले.
काँग्रेस उमेदवार वासनिक आणि सूरजेवाला यांना अतिरिक्त मते मिळाली. भाजपच्या आमदार शोभा राणी कुशवाहा यांनी त्यांना मतदान केले. याचप्रमाणे भाजप उमेदवार घनश्याम तिवारी यांनादेखील दोन अतिरिक्त मते मिळाली. याचाच अर्थ दोन्ही बाजूकडून मते फुटली. पक्षाचा आदेश झुगारून मर्जीतील उमेदवारांना काही आमदारांनी मतदान केले.
राज्यसभेच्या चार जागांसाठी 200 आमदारांनी मतदान केले. मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी काँग्रेस आणि भाजपने आमदारांना पंचतारांकित हॉटेलमध्ये हलविले होते. एका उमेदवाराला विजयासाठी 41 मतांची गरज होती. विधानसभेत काँग्रेसचे 108 आमदार आहेत. तर, भाजपचे 71 आमदार आहेत. मात्र, काँग्रेसला 18 अन्य आमदारांचा पाठिंबा होता. त्यामुळे त्यांचे संख्याबळ 126 होते. त्यामुळे, त्यांचे काँग्रेसचे तीनही उमेदवार विजयी झाले.
पाच आमदारांची पक्षाविरोधात भूमिका
मतांची फाटाफूट होऊ नये, यासाठी सर्वच पक्षांनी विशेष काळजी घेतली होती. याउपरही, पाच आमदारांनी पक्षाचा आदेश झुगारला. कर्नाटकात धर्मनिरपेक्ष जनता दलाचे (जेडीएस) आमदार के. श्रीनिवास गौडा यांनी आपण काँग्रेस उमेदवाराला मतदान केल्याचे सांगितले. तसेच, आपण काँग्रेसमध्ये सहभागी होणार असल्याचे त्यांनी प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितले. तर, आमदार एस.आर. श्रीनिवास यांनी कोरी मतपत्रिका मतपेटीत टाकली. जेडीएस नेता कुमारस्वामी यांनी 32 पैकी 30 आमदारांनी पक्षाला मतदान केले. मात्र, दोन आमदारांनी पक्षाविरोधात मतदान केल्याचे सांगितले. गेल्या काही दिवसांपासून कुमारस्वारी हे गौडा यांच्यावर नाराज होते. गौडा यांनी मतदारांचा, कार्यकर्त्यांच आणि पक्षाचा अपमान केला असल्याची प्रतिक्रिया कुमारस्वामी यांनी दिली. राजस्तानमधील ढोलपूरचे भाजप आमदार शोभा राणी कुशवाह मतदान करत असताना त्यांच्या पक्षाचे मतदान निरीक्षक राजेंद्र राठोड यांनी त्यांची वोट स्लिप घेतली, जी नियमांच्या विरोधात आहे.
छत्तीसगढमध्ये अपक्ष आमदार बलराज कुंडू गैरहजर
नवी दिल्ली : हरयानामध्ये 2 जागांसाठी 90 पैकी 89 आमदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अपक्ष आमदार बलराज कुंडू मतदानावेळी गैरहजर राहिले. काँग्रेस आमदार किरण चौधरी आणि बीबी बत्रा यांच्या मतदानावर सत्ताधारी भाजपने आक्षेप घेतला. भाजपकडून माजी मंत्री कृष्णलाल पनवार मैदानात उतरले होते. काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री अजय माकन यांना उमेदवारी दिली होती. तर, कार्तिकेय शर्मा अपक्ष म्हणून रिंगणात उतरले होते. भाजपप्रणित सरकारविरोधात अनेक मुद्द्यांवर आवाज उठवणारे अपक्ष आमदार बलराज कुंडू यांनी मतदानपासून दूर राहण्याचा निर्णय घेतला होता. गृहमंत्री अनिल विज आणि भाजपचे राज्य प्रमुख ओ. पी. धनकर यांनी त्यांच्या घरी जाऊन मन वळविण्याचा प्रयत्न केला.