आठ महिन्यांत ५४ टीएमसी पाण्याचा वापर

सुर्यकांत आसबे

सोलापूर : उजनी धरणातील तब्बल 54 टीएमसी एवढा उपयुक्त पाणीसाठा 8 महिन्यात संपला आहे. उजनी धरण मंगळवारी मृतसाठ्यात आले आहे. मागील पावसाळ्यात उजनी धरण 5 ऑक्टोबर रोजी 100 टक्के मध्यरात्री भरले होते. उजनी धरणातील पाणीसाठा पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पडणार्‍या पावसावर अवलंबून आहे. सोलापूर जिल्ह्यात कमी पाऊस होऊनसुद्धा पुणे जिल्ह्यात पडलेल्या पावसामुळे उजनी धरण अनेकवेळा ओव्हरफ्लो होते. कोयना आणि जायकवाडी या राज्यातील मोठ्या धरणातील पाणी साठवन क्षमतेपेक्षा उजनी धरणाची साठवण क्षमता जास्त असल्यामुळे ते राज्यातील सर्वात मोठे पाणीसाठा असलेले धरण म्हणून ओळखले जाते. उजनी धरण जेव्हा 100 टक्के भरलेले असते तेव्हा धरणात 117 टीएमसी पाणी असते. तर जेव्हा 111 टक्के भरलेले असते तेव्हा 123 टीएमसी पाणीसाठा असतो. उजनी धरणातील 124 टीएमसीपैकी 54 टीएमसी पाणीसाठा उपयुक्त आहे. तर 63 टीएमसी पाणीसाठा मृत आहे. तर 6 टीएमसी पाणी अतिरिक्त आहे. जवळपास 20 टीएमसी एवढे पाणी सोलापूर शहरासाठी वापरले जाते. आणि उर्वरित साठ्यापैकी बरेचसे पाणी शेतीसाठी विशेष करून ऊस पिकासाठी वापरण्यात येते. याचबरोबर धरणातील पाण्यावर शेकडो लहान मोठ्या गावांच्या पाणीपुरवठा योजनासुद्धा अवलंबून आहेत. तसेच अनेक औद्योगिक वसाहतींसाठीसुद्धा याच धरणातील पाण्याचा वापर केला जातो. म्हणून सोलापूर जिल्ह्यासह पुणे व अहमदनगर या जिल्ह्यातील कृषी, सामाजिक व राजकीय तसेच औद्योगिक क्षेत्राच्या दृष्टीने उजनी धरणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

दरम्यान उजनी धरणात पाणी अडवण्यास प्रारंभ झाल्यापासून ते 40 वर्षात उजनी धरण 33 वेळा शंभर टक्के भरले आहे. तसेच तेवढ्याच वेळात ते रिकामेसुद्धा झाले आहे. सन 2020 व सन 2021 सालात उजनी धरण 13 मे रोजी मायनसमध्ये गेले होते तर 2019 सालात उजनी धरण 15 मे रोजी मायनसमध्ये गेले होते. चालू वर्षी मात्र जूनच्या पहिल्या आठवड्यातच म्हणजे मागील वर्षीपेक्षा 21 दिवसांनी उजनी धरण मायनसमध्ये गेले आहे. सध्या उजनी धरणात 63.41 टीएमसी पाणीसाठा असून 0.24 टीएमसी उपयुक्त पाणीसाठा आहे. तर त्याची टक्केवारी 0.46 टक्के इतकी आहे. पाण्याची एकूण पातळी ही 490.995 मिटर आहे. नदीद्वारे विसर्ग बंद आहे. कालव्यातून 1500 क्यूसेक तर बोगद्यातून 70 क्यूसेकचा विसर्ग सुरु आहे. प्रतिदिन 5.86 द.ल.घ.मी. पाण्याचे बाष्पीभवन होते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा