लहानपणी नेहमी प्रश्न पडायचा की बाबांना कसा खिसा असतो त्यात ते पेन, सुट्टी नाणी कधी कधी बंदा नोटा ठेवतात. तसा आईला खिसा का नसतो. शाळेची फी भरताना बाबा कसे ऐटीत खिश्यातून काढून फी साठी पैसे देतात, किंवा प्रगति पुस्तकावर खिश्यातले पेन काढून ऐटीत सही करतात. तसा आई जवळ खिसा का नसतो. आणि जर असलाच खिसा तर नेमका कुठे असतो. आईला विचारलं तर ती फक्त हसायची. तुला भूक लागली असेल ना असं म्हणून पदर खोचून शिर्‍या साठी रवा भाजायला घेते. त्या रवा भाजण्याच्या वासावर भुकेशिवाय दुसरं काही सुचत नसे. एकदा खेळताना पडल्यावर पायाची जखम पुसायला कापसाचा बोळा मिळाला नाही म्हणून चक्क कॉटन च्या नव्या साडीच्या टोकाने माझी जखम पुसून काढली आणि कपाटातील कैलास जीवन काढून त्यातलं लोण्याच्या गोळ्यासारख मलम माझ्या जखमेवर लावलं. मला रात्री लवकर झोप यायची तेंव्हा घरातली काम लगबगीने आवरून ती तिच्या जुन्या साडीचा काठ घडी करून मला दिव्याच्या उजेडाने त्रास होऊ नये म्हणून डोळ्यावर मांडायची आणि मला त्या साडी सारखीचं अगदी तलम निद्रा यायची. कुठे बाहेर जाताना बाबा खिशातून पैसे काढून रेल्वेची तिकीट काढायचे आणि आई मात्र खिडकीतून झो झो येणारा वारा माझ्या कानाला बसतो म्हणून माझ्या काना केसांभोवती आपला पदर गुंडाळून घ्यायची. तेंव्हाही माझं लक्ष खिडकीतल्या बाहेरच्या दृश्या बरोबर बाबांच्या खिश्या कडे असायचं. मोठा झाल्यावर मी सुद्धा बाबांसारखा खिसा शिवून घेऊन त्यात वेगवेगळ्या वस्तू ठेवणार हे ठरवून ठेवले होते.नेमकी तेंव्हाच आई पदराच्या टोकाला गुंडाळून ठेवलेली गोळी (मला तहान लागली असताना) हळूच माझ्या जिभेवर ठेवायची. तृषा पूर्ण शांत व्हायची. कधी खेळताना सर्व मुलं बॉल आणण्यासाठी वर्गणी काढत अश्यावेळी आई तिच्या पदरात बांधलेला रुपया दोन रुपया काढून देत असे आणि वर रुपया देऊन उन्ह फार आहेत पेपरमिंट खा चघळायला म्हणून सांगत असे. मित्र म्हणत तुझी आई खूप छान आहे रे तेंव्हा कॉलर टाईट होत असे. आईकडे खिसा नसताना बाबापेक्षा जास्त गोष्टी तिच्याकडे कश्या हा प्रश्न मला मला थोडा मोठा होत होताना पडू लागला. आणि एक दिवस मला माझंच उत्तर सापडून गेलं. आईकडे खिसा असतो आणि त्या खिश्याला चौकट नसते तो आईचा पदर असतो जो कायम मुलांसाठी सुखं बांधून ठेवत असतो आणि तोच आईचा कधीही न रिक्त होणारा खिसा असतो. आईचा खिसा.

एकदा शाळेत मास्तर पप्पूचा पेपर तपासताना बेशुद्ध पडला. कारण, पप्पूनं उत्तरंच तसं लिहिले होते.
प्रश्न : कोणत्या युद्धात टिपू सुलतान मारला गेला?
उत्तर : शेवटच्या युद्धात!

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा