ध्रुवीकरणाचे भाजपचे आजचे राजकारण सत्तेसाठीच आहे. त्यातून देशातील सामंजस्याच्या वातावरणाला आव्हान मिळत असून, त्याबद्दल भागवत यांनी कानपिचक्या देणे आवश्यक होते.

प्रत्येक मशिदीत शिवलिंग कशाला शोधता? असा सवाल सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी केला. तो रास्त असला तरी सर्व स्वयंसेवक आणि संघ परिवारातील संघटनांच्या कार्यकर्त्यांना तो पटणार का? हा खरा प्रश्‍न! अर्थात, भागवत यांच्या विधानात मेख आहेच. वाराणसीतील ज्ञानवापीसंदर्भातील वाद सामंजस्याने सोडविला जावा, असे ते म्हणतात. तोडग्यासाठी पावले टाकली जावीत, असे त्यात ध्वनित आहे. इतिहासापासून धडे घेत भविष्यासाठी पावले टाकणे हा शहाणपणाचा मार्ग. मात्र केंद्रात पुन्हा भाजपचे सरकार आल्यापासून ठिकठिकाणचे कथित हिंदुत्ववादी कार्यकर्ते उत्खननाचे प्रणेते बनले. सामान्यांचे जगणे कसे सुसह्य होईल, यासाठी शक्ती खर्च करण्याऐवजी इतिहासातील मढी उकरून काढण्यात त्यांना धन्यता वाटते. हनुमानाचे जन्मस्थान शोधण्याच्या बैठकीचा झालेला आखाडा अशाच मानसिकतेचा भाग. राममंदिरासाठी आंदोलन उभे राहिले आणि देशातील राजकीय समीकरणे बदलून गेली. न्यायालयाच्या निकालानंतर दोन्ही पक्षांनी समजुतीची भूमिका घेत कटुतेचे वातावरण निर्माण होणार नाही हे पाहिले. आक्रमकांनी मंदिरे पाडली ही वस्तुस्थिती. इतिहासाचे ते ओझे वर्तमान बिघडवू शकते, याची जाणीव वाद पेटविणार्‍यांना नक्कीच आहे. पण, धर्मांधतेचे भूत त्यांच्यावर स्वार झालेले दिसते. मुस्लिम धर्मीय असल्याच्या संशयातून मध्य प्रदेशात एका ज्येष्ठ नागरिकाची हत्या करण्यात आली. यातून देशातील एका मोठ्या समुदायासमोर उद्वेगजनक स्थिती निर्माण होऊ शकते याचा विसर पडलेला दिसतो.

कृतीत कसा येणार?

केंद्रात आपले प्रचंड बहुमताचे सरकार असल्याने आपल्याला कोणत्याही कृतीचा, काहीही बोलण्याचा मुक्त परवाना मिळाला, अशी अनेकांची समजूत झाली. वृत्तवाहिनीवरील चर्चेमध्ये भाजपचे प्रवक्ते नवीन जिंदाल, नूपुर शर्मा यांनी केलेली विधाने या घटकाची मानसिकता स्पष्ट करतात. जग आता बंदिस्त राहिलेले नाही, आपण जे बोलतो आणि करतो त्याचे पडसाद जगात अन्यत्र उमटणार आहेत, याचेच भान त्यांना राहिले नाही. त्यांच्या वक्तव्याचे इस्लामी जगात जोरदार पडसाद उमटले. जरी या वक्तव्याशी सरकारचा अजिबात संबंध नसला, तरी ते सत्तारूढ पक्षाचे प्रतिनिधी आहेत ही वस्तुस्थिती उरतेच! यातून देशाच्या प्रतिमेवर परिणाम होण्याचा धोका आहे. कट्टर हिंदुत्ववाद देशात नकोच, असेही मोहन भागवत म्हणाले. पण, भाजपचे बहुमताचे सरकार हीच संधी, असे मानणारा वर्ग आहे. काही महंतांनी भागवत यांच्याबद्दल व्यक्त केलेली चरफड बरेच सांगून जाते. त्यामुळे भागवत यांनी सामंजस्याचा सूर आळवला असला, तरी पुढच्या काळात धार्मिक तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होणारच नाहीत असे नव्हे. उत्तर प्रदेशात योगी आदित्यनाथ यांनी शहरांची नावे बदलण्याचा सपाटा लावला. यातून शांतता आणि सौहार्दाच्या वातावरणाचा संदेश दिला जाणार आहे का? संघ याचे उत्तर देणार नाही! अथवा ‘भावी पंतप्रधान’ म्हणून प्रतिमा उभी केली जात असलेल्या योगींना रोखण्याचे धाडसही दाखविणार नाही. त्यामुळे कितीही विधायक भूमिका असली, तरी ती कृतीत येणार नसेल तर उपयोग शून्य. भागवत यांनीच मध्यंतरी अखंड भारताचे सूतोवाच केले. येत्या पंधरा वर्षांत अखंड भारत साकारला जाऊ शकतो, असे त्यांनी म्हटले होते. धर्माच्या आधारावर देश निर्माण होऊ शकतो; पण तो स्थिर राहू शकत नाही, हे पाकिस्तानने दाखवून दिले. सर्व घटकांना धर्म बांधून ठेवू शकला असता, तर पाकिस्तानची फाळणी झाली नसती. आज पाकिस्तान अस्तित्वासाठी झगडत आहे. त्यासाठी त्याला काल्पनिक शत्रू उभे करावे लागतात. धार्मिक उन्माद, कट्टरतावाद यातून त्या देशाचा वर्तमान पोळून निघाला, मुस्लीम धर्मीयांसह तेथे उरल्यासुरल्या अल्पसंख्याकांची होरपळ सुरू आहे. अशा वेळी आपली बहुसांस्कृतिक ओळख आणखी ठळक करण्याची संधी भारताने गमावता कामा नये. पाकिस्तानचे विघटन होणार असेल, तर ती शक्यता सर्वसमावेशक भारतीय संस्कृती बळकट होण्यातच दडली आहे. त्याऐवजी इतिहासातील भल्याबुर्‍या घटनांची सतत उजळणी समर्थ भारताच्या मार्गातील अडथळा ठरेल.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा