अहमदनगर : माजी उपमहापौर श्रीपाद छिंदम, त्याचा भाऊ श्रीकांत छिंदम यांना नगर जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले आहे.या व्यतिरिक्त संगमनेर तालुक्यातील मालुंजे येथील संदीप घुगे या टोळीप्रमुखासह त्याच्या अन्य 5 साथीदारांनादेखील 2 वर्षांसाठी हद्दपार करण्यात आले आहे. अन्य 2 टोळीतील 4 जणांना वर्षभरासाठी जिल्ह्यातून हद्दपार करण्यात आले असल्याचा आदेश पोलिस अधीक्षक मनोज पाटील यांनी काढला.

श्रीपाद छिंदम याने उपमहापौर असताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर राज्यभर असंतोष पसरला होता. छिंदम बंधूंविरुद्ध मारहाण करणे, गंभीर दुखापत करणे, रक्कम बळजबरीने काढून घेणे, ठार मारण्याची धमकी देणे यासारख्या गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यांच्याविरोधात तोफखाना पोलिसांत 7 गुन्हे दाखल आहेत.

संदीप घुगे टोळीप्रमुखासह मारुती नागरे, विजय डोंगरे, अमोल डोंगरे, दीपक डोंगरे, शशिकांत उर्फ मंगेश नागरे यांच्याविरुद्ध संगमनेर तालुका पोलिसांत गंभीर स्वरुपाचे 6 गुन्हे दाखल आहेत. या सर्वांना जिल्ह्यातून वर्षाकरिता हद्दपार करण्यात आले.

अक्षय सुभाष सोनवणे (वाडेगव्हाण, पारनेर) या सराईत गुन्हेगारालाही 2 वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे. त्याच्याविरुध्द बेलवंडी पोलिसांत 2 गुन्हे दाखल आहेत. केडगाव येथील टोळीप्रमुख अविनाश जायभाय (24) याच्यासह त्याचे साथीदार ऋषिकेश अशोक बडे (23), नितीन उर्फ किरण लाड (22, भगवाननगर, सारसनगर) यांच्याविरुध्दही भिंगार पोलिसांत 10 गंभीर स्वरुपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यामुळे त्यांनाही 2 वर्षांकरिता हद्दपार करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा