विदेशातील फळांना पुणेकरांची पसंती
पुणे : हंगामानुसार बाजारात विविध फळांची आवक होत असते. सद्य:स्थितीत देशासह विविध सोळा देशांतील फळे मार्केटयार्डातील फळ बाजारात उपलब्ध आहेत. त्यात सफरचंद, ड्रॅगन फ्रुट, चेरी, पेर, मोठी द्राक्ष, गोंड चिंच, आवाकडू, ब्लू बेरी, लाल आणि हिरवा पेरू, रबूतान, मँगो स्टीम, पपनस, प्लम आदींचा त्यास समावेश आहे. यातील बहुतांश फळे पुणेकरांच्या पसंतीस उतरत आहेत.
विदेशातील फळे ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. त्यामुळे किंमत अधिक असूनही या फळांनाही बाजारात ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. दक्षिण आफ्रिका, इटली, स्पेन, बेलझियम, इराण, टरकी, वॉशिंग्टन, न्यूझीलंड, पोलंड, तुर्कस्थान, अर्जंटिना, इराण, गिरीस, चिली, व्हिएतनाम, आस्ट्रोलीया या देशांतून आयात केल्या जाणार्या फळांची मागणी दरवर्षी वाढतच आहे. बाजारात या फळांची आवक सुरू झाली आहे. मुंबई आणि चेन्नई या शहरांतून परदेशी फळांची आवक होते. यंदा विदेशी फळांच्या मागणीमध्ये दुपटीने वाढ झाली आहे. उन्हाळ्यात फळांना मागणी अधिक वाढते. विदेशातील फळे बाजारपेठेसह मॉल्समध्येही मोठ्या प्रमाणात दाखल होत आहेत.
परदेशातील सर्वच वस्तूंचे सर्वसामान्यांना नेहमी आकर्षण राहिले आहे. त्याला फळेही अपवाद राहिलेली नाहीत. त्यामुळे बाजारात वर्षभर जगभरातील विविध फळे पाहायला मिळतात. परदेशांमध्ये मोठ्या प्रमाणात शीतगृहांची व्यवस्था असल्यामुळे ही फळे चांगल्या स्वरुपात आणि वेळेवर बाजारात दाखल होतात. मार्केटयार्डातील फळ बाजारात रविवारी 70 ते 80 टन तर इतर दिवशी सुमारे 30 ते 50 टन परदेशी फळांची आवक होते. विदेशी फळांच्या मागणीत गेल्या 7 ते 8 वर्षांत मोठी वाढ झाली आहे. इतर फळांच्या तुलनेत सुमारे 30 ते 40 टक्के परदेशी फळांची बाजारात आवक होते. परदेशी फळांना वेगळी चव असल्याने त्यांना बाजारात मागणी आहे. बाजारात चांगला ग्राहक आहे. दर अधिक असले तरी दिवसेंदिवस या फळांना मागणी वाढत असल्याचे फळांचे व्यापारी सलीम बागवान यांनी सांगितले
बाजारात सर्वाधीक सफरचंदची आवक
हवाई, समुद्रामार्गे विदेशातील फळे भारतात आयात केली जातात. चेरी, ऍप्रिकोट, जर्दाळू, ब्लू बेरी, रासबेरी आदी फळे विमानाने पाठविली जातात. तर, इतर सर्व फळे जहाजातून मुंबई आणि चेन्नई पोर्ट येथे पाठविली जातात. तेथून ही सर्व फळे देशभरात पाठविली जातात. बाजारात सर्वाधिक सफरचंद आयात होतात.
- बाबा बिबवे, फळ विभागप्रमुख, कृषी उत्पन्न बाजार समिती.