पुणे : अंदमान आणि केरळपर्यंतचा वेगाने प्रवास करणारे नैऋत्य मोसमी वारे (मान्सून) अरबी समुद्रात स्थिरावले आहेत. मागील दोन दिवसांपासून मान्सूनची स्थिती ‘जैसे थे’ आहे. पोषक स्थिती निर्माण झाल्यास अवघ्या दोन दिवसांत पासून राज्यात दाखल होईल. असा अंदाज हवामान विभागाने शुक्रवारी वर्तविला आहे.
मान्सून केरळात दाखल झाल्यानंतर संपूर्ण करळ व्यापून मान्सूनने पुढील प्रवास सुरूच ठेवला होता. सद्य:स्थितीत संपूर्ण इशान्य भारत मान्सूनने व्यापला आहे. तसेच कर्नाटकची संपूर्ण किनारपट्टी मान्सूनने व्यापली आहे. विशेष म्हणजे मान्सून गोव्याच्या उबंरठ्यावर येवून स्थिरावला आहे. कोकण किनारपट्टीपासून काही अंतरावर मान्सून असल्याने प्रत्यक्ष मान्सूनच्या आगमनाकडे सर्वांचेच डोळे लागले आहेत. सुमारे 5 ते 6 जून दरम्यान मान्सून राज्यात दाखल होईल, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला होता. त्यामुळे अंदमान आणि केरळात अंदाजानुसार दाखल झालेला मान्सून महाराष्ट्रात अंदाजानुसार दाखल होईल का? अशी चर्चाही सर्वत्र सुरू झाली आहे.
दरम्यान, येत्या मंगळवारपर्यंत संपूर्ण राज्यात मेघगर्जना आणि वीजांच्या कडकडाटात पाऊस होणार असल्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. मागील 24 तासात कोकण, गोव्यात काही ठिकाणी मेघगर्जनेसह मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्र व मराठवाड्यातही काही ठिकाणी हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला. विदर्भात मात्र हवामान कोरडे होते. विदर्भात काही ठिकाणी उष्णतेची लाट कायम होती. त्यामुळे तेथील कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तर मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी व मराठवाड्यात तुरळक ठिकाणी कमाल तपमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. पुण्यातही आठवडाभर ढगाळ वातावरण असणार असून पावसाचा अंदाज आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा