लोणावळा (वार्ताहर) : लोणावळ्यात पर्यटनासाठी येत असलेल्या पर्यटकांच्या डस्टर मोटारीने जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्यात अचानक पेट घेतल्याने या मार्गाने प्रवास करणार्‍यांना ’बर्निंग कार’चा थरार अनुभवायला मिळाला. सुदैवाने या घटनेत कोणत्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही, मात्र मोटार पूर्णत: जाळून खाक झाली. गुरुवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास खंडाळ्यात द्रुतगती मार्गाच्या पुलाखाली ही घटना घडली. लाल रंगाची रेनॉल्ट डस्टर (क्र. एम. एच. 04. जी.जे.0353) मोटार घेऊन मुंबईमधून लोणावळा येथे पर्यटनासाठी पाच जण निघाले होते.

खोपोली येथे काही काळ थांबल्यानंतर ते खंडाळा बोरघाट चढून वर लोणावळ्याच्या दिशेने येत असताना खंडाळ्यात अचानक त्यांच्या गाडीच्या बॉनेटमधून धूर निघू लागला आणि क्षणार्धात गाडीने पेट घेतला. मात्र तत्पूर्वी गाडीतील पाचही जणांना गाडीतून सुखरूप बाहेर पडण्यात यश आले.

या घटनेची खबर मिळताच पोलीस उपनिरिक्षक लतीफ मुजावर, सहाय्यक फौजदार सदाशिव पिरगणवार, नाईक मयूर अबनावे, शिपाई स्वप्नील पाटील, मदतनीस सतीश ओव्हाळ, दर्शन गुरव, तुषार घाडगे, विशाल दातीर, नितेश पडवळ यांनी घटनास्थळी धाव घेत मदतकार्य सुरू केले. घटनास्थळी दाखल झालेल्या लोणावळा नगरपरिषदेच्या, तसेच आयआरबीच्या अग्निशमन दलाला पाऊण तासात ही आग विझवण्यात यश मिळाले. दरम्यान या कालावधीत जुन्या मुंबई पुणे राष्ट्रीय महामार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी झाली होती.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा