लखनऊ : आशियातील श्रीमंत उद्योजकांपैकी एक गौतम अदानी यांनी उत्तर प्रदेशवर हजारो कोटींची खैरात केली आहे. अदानी समूहाने उत्तर प्रदेशात थोडीथोडकी नव्हे तर तब्बल ७० हजार कोटींची गुंतवणूक करण्याची घोषणा केली.

‘उत्तर प्रदेश इन्व्हेस्टमेंट समीट २०२२’ या परिषदेत बोलताना गौतम अदानी यांनी ही घोषणा केली. यावेळी त्यांनी अदानी समूह उत्तर प्रदेशात ७०,००० कोटींची गुंतवणूक करेल, अशी घोषणा केली. या प्रचंड गुंतवणुकीने उत्तर प्रदेशात ३०,००० नोकऱ्या तयार होतील, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

अदानी समूह उत्तर प्रदेशात रस्ते आणि महामार्ग विकासासाठी २४,००० कोटींची गुंतवणूक करेल. त्याशिवाय मल्टीमॉडेल लॉजेस्टिक आणि संरक्षण क्षेत्रात अदानी समूह ३५,००० कोटींची गुंतवणूक करणार आहे. यापूर्वी अदानी समूहाने गुजरातमध्ये हरित उर्जेसाठी जवळपास ३५,००० कोटींची गुंतवणूक केली होती.

या परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्तर प्रदेशात ८०,००० कोटींच्या कामांचे भूमीपूजन केले होते. या निधीतून १,४०६ प्रकल्प उभारले जाणार आहेत. कृषी, आयटी, एमएसएमई, कारखाना उत्पादन, ऊर्जा, फार्मा, संरक्षण, अवकाश तंत्रज्ञान, पर्यटन या क्षेत्रात हे प्रकल्प उभारले जाणार आहेत.

उत्तर प्रदेशातून एक जिल्हा एक उत्पादन या अभिनव उपक्रमाने राज्यातील निर्यात १.५६ लाख कोटींपर्यंत वाढली असल्याचे उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सांगितले. त्याशिवाय उत्तर प्रदेशातील बेरोजगारी दर १८ टक्क्यांवरुन २.९ टक्के इतका खाली आला असल्याचे आदित्यनाथ यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा