समृद्धी धायगुडे

नव्वदच्या दशकातील पिढीला ज्या मृदू आवाजाने वेड लावले असे गायक कृष्णकुमार कुन्नाथ म्हणजेच ‘के के’ यांच्या अचानकन निधनाने त्यांचा चाहता वर्ग पोरका झाला आहे. तेव्हा सोशल मीडिया किंवा सर्वत्र जिथे जाऊ तिथे कोणत्याही गायकाचे किंवा कलाकाराचे मार्केटिंग करण्याची पद्धतच नव्हती. किंबहुना ही यंत्रणाच नसल्याने केवळ केसेट हा एकमेव मार्ग होता. पण त्याही काळात किंवा आजही माझं एक गाणं येतंय.. जरुर ऐका… अशा समाजमाध्यमांवरच्या जाहिराती त्याने कधीच केल्या नाहीत. त्याची गाणी अनेकांच्या ओठांवर आहेत, आवडीची आहेत, पण त्याचा चेहरा माहिती नाही. त्याला कायम शोधावंच लागायचं… त्याचे समकालीन आणि त्याच्यानंतर आलेल्या गायकांच्या भाऊ गर्दीत तो कुठेच दिसायचा नाही. हे सगळं त्याला माहिती होतं, पण त्याचा हुकमी एका म्हणजे फक्त गाणेच होते. या शिवाय त्याला इतर कोणत्याही गोष्टींनी फरक पडला नाही. माझं गाणं लोकांनी कानात साठवावं, मनात ठेवावं, माझा चेहरा लक्षात राहिला नाही तरी चालेल… असे म्हणणारा हळवा, विनयशील, त्याच्या आवाजाप्रमाणेच स्वभावातही पुरेपूर माधुर्य असलेला ‘केके’. तो आज त्याने गायलेल्या गाण्याप्रमाणेच अचानक कोणालाही न सांगता निघून गेला आहे. त्याच्या गाण्यांमधून साठवलेला ‘केके’ तेवढा आपल्याकडे उरला आहे… नव्वदच्या दशकात इंडी-पॉपच्या जमान्यात तो नावा रूपाला आला, पण त्याचा आवाज आजही तरुण पिढीच्या मनावर राज्य करतो.

नव्याने कॉलेज मध्ये प्रवेश घेतलेला तरुण असो, तिथे नव्याने प्रेमात पडलेला तरुण असो, अगदी प्रेम भंग झालेला तरुण असो या प्रत्येक मनात, कानात के के तितक्याच प्रेमाने असतोच.

विसाव्या शतकाच्या अखेरीस भारतीय चित्रपट संगीतात एका ‘केके’ नावाच्या गायकाची पुसटशी ओळख होती. एकविसावे शतक उजाडेपर्यंत केकेच्या सूरांचे गारुड प्रत्येक तरुणावर होते. मुलाचा दिल्लीचा आणि तिथेच लहानाचा मोठा झालेला केके उर्फ कृष्णुकमार कुन्नथ गायक होण्याचे स्वप्न उराशी बाळगून १९९४ मध्ये मुंबईत आला.

त्याआधी दिल्लीत गाण्याचे कार्यक्रम करणाऱ्या केकेचा आवाज प्रसिद्ध गायक, संगीतकार हरिहरन यांनी ऐकला. त्यांनीच त्याला मुंबईत येण्याचा सल्ला दिला होता. सर्वसामान्य गायकाप्रमाणे स्वप्न उराशी घेऊन मुंबईत आलेल्या केकेलाही आल्या-आल्या गायक म्हणून संधी मिळाली नाही. ‘कलोनियल कझिन्स’मुळे घराघरात पोहोचलेल्या लेस्ली लुईस यांच्यामुळे केकेला जिंगल्स गाण्याची संधी मिळाली. आपल्याकडे जे जे येईल ते प्रामाणिकपणे करत राहायचे या वृत्तीने केकेने चार वर्षांत तब्बल साडेतीन हजार जिंगल्स गायली होती. त्याच सुमारास ए. आर. रेहमान यांच्यासाठीही एक – दोन दाक्षिणात्य भाषेतील गाणी त्याने गायली. अगदी १९९६ मध्ये प्रदर्शित झालेल्या गुलजार यांच्या ‘माचिस’ चित्रपटात ‘छोड आए हम’ या गाण्यात हरीहरन, सुरेश वाडकर यांच्याबरोबरीने केकेचाही आवाज होता. या एप्रिलमध्ये पुन्हा एकदा केके आणि गीतकार गुलजार ही जोडी नव्या गाण्याच्या निमित्ताने एकत्र आली. तेव्हा कारकिर्दीतील पहिली संधी आणि त्यानंतर इतक्या वर्षांनी गुलजार यांच्याशी झालेल्या भेटीचा हा क्षण केकेने चाहत्यांशी शेअर केला.

केके साठी १९९९ हे वर्ष खूप महत्वाचे ठरले. त्यावेळी इंडीपॉप लोकप्रिय होते. खुद्द लेस्ली लुईस – हरिहरन ही जोडी ‘कलोनियल कझिन्स’ या त्यांच्या अल्बममुळे चर्चेत होती. लेस्ली लुईस यांच्या संगीताने नटलेली पॉप गाणी प्रसिद्ध होती. केकेचा प्रवेश इथेही काहीसा उशिराने झाला होता, मात्र त्यावेळीही शंकर महादेवन यांचे ‘ब्रेथलेस’, लकी अलीचे ‘ओ सनम’, शानचे ‘तनहा दिल’ अशी अनेक पॉप गाणी आणि अल्बम्स कमाल लोकप्रियता मिळवत होती. या सगळ्या गर्दीत केकेचे हळूवार आवाजातले ‘पल’ हे गाणे प्रदर्शित झाले. लेस्ली लुईस यांच्याबरोबर केलेला त्याचा पहिला स्वतंत्र अल्बम होता ‘पल’. या अल्बममधील त्याच्या शीर्षकगीताबरोबरच ‘यारों’ हे आणखी एक गाणे प्रसिद्ध झाले होते. पॉप संगीतात ही दोन हळूवार गाणी प्रेक्षकांचे मन जिंकत असताना भन्साळींच्या ‘हम दिल दे चुके सनम’मधील केकेचे सलमान खानवर चित्रित झालेलं ‘तडप तडप के’ हे गाणं थेट रसिकांच्या मनाला भिडले आणि एकंदरीत भारतीय चित्रपट संगीतात ‘केके’ नावाचे सुरेल मृदू आवाजाचे पर्व सुरू झाले.

पैशांच्या हव्यासापोटी गात राहणे हा केकेचा कधीच अट्टाहास नव्हता. त्यामुळे त्याने खूप गाणी गायली आणि तो प्रसिद्ध झाला. शास्त्रीय संगीताचे बाळकडू न घेतलेला केके मला गाणं ऐकून समजतं, ते गाता येतं… माझ्याकडे ती दैवी देणगी होती, असे म्हणायचा. किशोर कुमार हे त्याचे आवडते गायक… अगदी त्यांनीही कधी शास्त्रीय संगीताचे प्रशिक्षण घेतले नव्हतं हे कळल्यावर तर त्याने आपल्या पद्धतीने आपले गाणं मोठे केले आणि आपल्यापर्यंत पोहोचवले. ‘तडप तडप के’ लोकप्रिय झाल्यावर सलमानसाठी गाणी गाण्याच्या ऑफर्सचीही त्याच्याकडे लाट आली होती. पण त्याला तेही नको होतं, कुठल्याही अभिनेत्याचा आवाज बनून राहायचे नाही, हे त्याने ठरवले होते. त्यामुळे नवं काही आपल्याकडे येईल ते गायचे, वेगवेगळ्या भाषेत स्वतःतल्या गायकाला आजमवायचे, लाईव्ह संगीत कार्यक्रमांतून मनातलं गाणं प्रेक्षकांना ऐकवत त्यांचे भरभरून प्रेम अगदी शेवट पर्यंत मिळवले. हे त्याचे निखळ जगणं होते. जसा के के एखाद्या अभिनेत्याची सावली झाला नाही तसा त्याने कोणत्याही वैयक्तिक सोहळ्यात देखील न गाण्याचा निश्चय अखेर पर्यंत पाळला.

फक्त केके…

‘अपडी पोडू’ हे त्याचं तमिळ गाणं भलतंच लोकप्रिय ठरलं होतं. ‘क्या मुझे प्यार है’ हे ‘वो लम्हें’ या चित्रपटातले गाणं, ‘ओम शांति ओम’मधील ‘आँखो मे तेरी’, ‘खुदा जाने’ हे ‘बचना ऐ हसीनों’मधलं गाणं, ‘आशिकी २’चं ‘पिया आए ना’, ‘झंकार बीट्स’मधलं ‘तू आशिकी है’, ‘रेहना तेरे दिल मै’चं ‘सच कहे रहा है’, ‘इक्बाल’चे ‘आशाएं’, ‘काईट्स’मधलं ‘दिल क्यूं ये मेरा शोर करे’, ‘बजरंगी भाईजान’साठी गायलेलं ‘तू जो मिला’… अशी कितीतरी अवीट गाणी त्याने गायली. केवळ चित्रपटच नव्हे तर ‘कोक स्टुडिओ’सारखे प्रयोग असोत वा मालिकांची शीर्षकगीतं… जे जे त्याच्याकडे आले त्याचे त्याने सोनंच केले. ते गाणं किती लोकप्रिय झाले याची चाचपणी मी सुरुवातीचे काही दिवस करायचो आणि मग सोडून द्यायचो. कोणतं गाणं किती लोकप्रिय आहे हे शेवटी मला लाईव्ह शोजमधून प्रेक्षकांकडून जी मागणी होते त्यातून लक्षात येते, असे केके म्हणायचा.

पार्श्वगायक म्हणूनच केकेची लोकप्रियता…

त्यांची गाणी, खास त्यांचा आवाज यासाठी पार्श्वगायक – पार्श्वगायिका ओळखले जायचे. केके हा अशा प्रकारे ओळखल्या जाणाऱ्या गायक – गायिकांच्या पिढीतला तसा शेवट शेवटचाच असे म्हणावे लागेल.सलमान खान असो, इम्रान हाश्मी असो,अक्षयकुमार असो, निल नितीन मुकेश असो, रणवीर कपूर असो आमच्या समोर फक्त तूच येतोस ते तुझ्या आवाजातील किमयेमुळे. ‘याद आएंगे पल’ गाणे लागले की, डोळे भरलेच पाहिजे. ही इतकी ताकद केवळ तुझ्याच आवाजातच होती. तुझ्या या मृदू आवाजाची अशी भैरवी व्हायला नको होती.

हल्ली हिंदी चित्रपटांमधून नवे गायक – गायिका येतात आणि निघूनही जातात. त्यांची नावंही कोणाच्या लक्षात येत नाहीत. मात्र केकेसारख्या गायकाने दोन दशकांहून अधिक काळ रसिकांच्या मनात आपली गाणी, आपला आवाज टिकवून ठेवण्यात यश मिळवले.
तेही व्यावसायिकतेच्या नफेखोरीत स्वतःच्या गायकीचा बळी न देता… हे गणित त्याने कसं जमवलं, याचं उत्तर बहुधा त्याच्या स्वभावात असावे. त्याचा मुळातच विनयशील स्वभाव, प्रसिद्धी लोलुपतेचा स्वतःला स्पर्श होऊ नये यासाठी केलेली धडपड, गाणंच शिकावं – तेच वाढवावं हा अट्टहास आणि निखळ स्वभाव हे सगळं अलवार प्रेम त्याच्या गाण्यातही उतरलं. म्हणूनच तो म्हणायचा त्याप्रमाणे त्याच्या चाहत्यांनी त्याला कानात साठवला आहे. जसे नव्वदच्या दशकातील पिढी स्लॅमबुकमध्ये आपल्या आवडीच्या व्यक्तींची माहिती गोळा करायची तसे केकेला आपल्या प्रेमाच्या स्लॅमबुकमध्ये जपणार आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा