राहाता (वार्ताहर) : तालुक्यातील पुणतांबे येथे शेतकर्‍यांच्या प्रलंबित प्रश्नांसाठी शेतकरी पुतळ्याला दुग्धाभिषेक करून गावातून शेतकरी दिंडी काढली. येथील शेतकर्‍यांनी आंदोलनाची मशाल पेटवत कालपासून (बुधवार) पाच दिवसीय धरणे आंदोलन सुरू केले. पुणतांब्याच्या शेतकऱ्यांनी ५ वर्षांपूर्वी संपाची हाक देत धरणे आंदोलन सुरू केल्याने संपूर्ण राज्याचे लक्ष या आंदोलनाकडे लागले होते.

राज्यात सध्या कांदा, ऊस, वीज, दूध, भाजीपाला सह शेतमालाच्या दराचा प्रश्न अधिक गंभीर होत आहे. हे प्रश्न सोडवण्याचा ऐवजी केंद्र व राज्य सरकार एकमेकांवर चालढकल करत आहे, अशी शेतकर्‍यांची भावना निर्माण झाली आहे. १५ दिवसांपूर्वी शेतकर्‍यांची बैठक घेऊन व २३ मे रोजी ग्रामसभा घेऊन उसाला एकरी हजार रुपये अनुदान द्यावे, शिल्लक उसाला हेक्टरी 2 लाख नुकसान भरपाई द्यावी, कृषी पंपाचे वीज बिल माफ करावे, शेतकर्‍याला दिवसा 12 तास वीज द्यावी, उत्पादन खर्चापेक्षा कमी दरात विकलेल्या कांद्यास उत्पादन खर्चावर आधारित अनुदान द्यावे, कायमस्वरूपी 3 हजार रास्त दरासाठी ठोस निर्णय घ्यावा, दुधाला 70-30 सूत्राप्रमाणे एफआरपी निश्चित करण्यात यावा आदी ठराव सामंत करण्यात आले.

शासनाला ७ दिवसांची मुदत देण्यात आली होती. मात्र शेतकरी प्रश्नांकडे राज्य सरकार दुर्लक्ष करीत असल्याची भावना शेतकर्‍यांमध्ये निर्माण झाल्याने कालपासून शेतकर्‍यांनी ५ दिवसांचे धरणे आंदोलन सुरू केले आहे.

या आंदोलनात सरपंच डॉ. धनंजय धनवटे, धनंजय जाधव, सुहास वहाडणे, सुभाष कुलकर्णी, सुभाष वहाडणे, संगीता भोरकडे, चांगदेव धनवटे, बाळासाहेब चव्हाण, नामदेव धनवटे आदींसह परिसरातील शेतकरी सहभागी झाले आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा