आदिवासींची पाण्यासाठी भटकंती

भीमाशंकर, (वार्ताहर) ः आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील भीमाशंकर, आहूपे व पाटण खोरे मुसळधार पावसाचे माहेरघर समजले जाते. या खोर्‍यामध्ये चार महिने मुसळधार पाऊस पडूनही डिंभे धरण पाणलोट क्षेत्रासाठी वरदान ठरलेले पाटण खोरे कोरडे झाले असून येथील आदिवासी बांधवांना आता पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे.
डिंभे पाणलोट क्षेत्र हे गतवर्षी या परिसरामध्ये पडणार्‍या मुसळधार पावसामुळे तुडुंब भरून वाहत होते. या पाणलोट क्षेत्रामुळे या परिसरातील पाटण, म्हाळुंगे, कुशिरे खुर्द व बुद्रुक, मेघोली, बेंढारवाडी ही गावे ओलीताखाली येऊन या भागातील शेतकरी या पाणलोट क्षेत्रातून उपसा सिंचनाव्दारे मोठ्या प्रमाणात रब्बी पिके घेऊ लागला. या पाणलोट क्षेत्रातून पाणी उपसा करून बाजरी, गहू, बटाटे आदिंसारखी पिके घेऊ लागला. परंतु उन्हाळ्याची तीव्रता वाढत आहे. तसे डिंभे धरणातील पाणी कमी होऊन हे पाणलोट क्षेत्र ओस पडू लागले आहे.
पश्चिम भागामध्ये गतवर्षी मुसळधार पाऊस पडला आणि पूर्व भागासाठी कालव्याद्वारे मोठ्या प्रमाणात पाणी सोडल्यामुळे डिंभे धरणातील पाणीसाठा कमी झाला, अन् पाणलोट क्षेत्र कोरडे पडले. सावरली, पिंपरी, साकेरी या गावच्या उशाला डिंभे धरण असूनही या भागातील लोकांच्या घशाला कोरड पडली आहे. विस्तारित झालेल्या पाणलोट क्षेत्रामुळे आदिवासी नागरिकांचे जीवनमान उंचावण्यासाठी या भागामध्ये उपसा सिंचन योजना लवकरात लवकर राबविण्यात यावी, अशी मागणी होत आहे. खोर्‍यामध्ये असणार्‍या सावरली, पिंपरी, साकेरी या गावाला दुष्काळाचा मोठ्या प्रमाणात सामना करावा लागत आहे. डिंभे धरणाचे पाणलोट क्षेत्र व फुगवटा या गावांपासून हाकेच्या अंतरावर असूनही या गावातील आदिवासी बांधवांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण फिरावे लागत आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा