नवी दिल्ली ः राज्यसभेचे खासदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष माणिक साहा यांच्याकडे शनिवारी आश्‍चर्यकारक घडामोडीनंतर मुख्यमंत्री पदाची सूत्रे आली. मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी काल अचानक पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर, विधिमंडळ पक्षनेतेपदी साहा यांची निवड करण्यात आली. 
त्रिपुरा भाजपमधील वाद काल चव्हाट्यावर आला. देब यांच्या कार्यशैलीमुळे अनेक आमदार नाराज होते. यातूनच तीन आमदारांनी राजीनामा दिला होता. 
साहा यांची महिन्याभरापूर्वीच राज्यसभेवर निवड झाली होती. आता मुख्यमंत्री पदाची सूत्रे त्यांच्याकडे आल्याने राज्यसभेतील एक जागा रिकामी होणार आहे. त्याजागी देब यांची निवड केली जाण्याची शक्यता आहे. 
भाजप नेते भूपेंद्र यादव यांनी साहा यांचे छायाचित्र ट्विटरवर शेअर करतानाच, विधिमंडळ नेतेपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे. देब यांनीदेखील साहा यांचे अभिनंदन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टी आणि नेतृत्वाखाली त्रिपुराची प्रगती होईल, असे ट्विट देब यांनी केले आहे.
तत्पूर्वी, देब यांनी राज्यपाल एस.एन. आर्य यांची भेट घेत राजीनामा पत्र सोपविले. त्यानंतर मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानी पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत साहा यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली. 
देब यांनी साहा यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला. मात्र, राम प्रसाद पॉल यांनी विरोध केला. त्यामुळे आमदारांमध्ये बाचाबाची झाली. यावेळी काही खूर्च्यांची तोडफोड करण्यात आली, असेही सूत्रांनी सांगितले. उपमुख्यमंत्री जिष्णू देव वर्मा यांच्याकडे मुख्यमंत्री पदाची सूत्रे सोपवली पाहिजे, असा त्यांचा आग्रह होता. भाजपचे ज्येष्ठ नेते भूपेंद्र यादव आणि विनोद तावडे यांनी निरीक्षक म्हणून काम पाहिले. 
मी पक्षाचा एक सामान्य कार्यकर्ता होतो आणि यापुढेही राहणार आहे, असे साहा यांनी मुख्यमंत्री पदाच्या निवडीनंतर पत्रकारांशी बोलताना सांगितले.
देब यांनी राजीनामा देण्यापूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजप अध्यक्ष जे.पी. नड्डा यांची भेट घेतली. मी भाजपचा निष्ठावान कार्यकर्ता आहे. पक्षाने सोपविलेले जबाबदारी नेटाने पार पाडेल, असे देब यांनी सांगितले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा