डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांचे प्रतिपादन

पुणे ः आपली जबाबदारी, कर्तव्ये काय आहेत? याचे प्रतिबिंब राज्यघटनेत असून, ते समजून घेतले पाहिजेत आणि ते आपल्या जीवनाचे मूल्ये बनविले पाहिजे, असे प्रतिपादन मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी केले.
वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या 148 व्या ज्ञानसत्रात ‘भारताचे संविधान आणि आम्ही भारताचे लोक’ या विषयावर डॉ. शमसुद्दीन तांबोळी यांनी 24 वे पुष्प शनिवारी गुंफले.
प्रा. तांबोळी म्हणाले, आपली भूमी संतांची, समाजसुधारकांची आहे. हे सर्व संचित असून आपला वारसा आहे. आपला इतिहास समजून घेतला पाहिजे. इतिहासातून माणसे घडत आहेत. आपले जगणे, इतिहास समजून घेतला पाहिजे. शांततापूर्ण अस्तित्वाची आपली संस्कृती आहे. जगातील सर्व चांगले तत्त्वज्ञान आपल्या संस्कृतीने घेतली आहे. महाराष्ट्राचे दैवत छत्रपती शिवाजी महाराज आहेत. त्यांचे विचार आज अमलात आणण्याचे गरज आहे. समाज सुधारकांनी आपल्याला स्वातंत्र्य मिळवून दिले. हा इतिहास देदीप्यमान आहे. लोकमान्य टिळक आपल्या शेवटच्या श्‍वासापर्यंत देशाच्या हितासाठी लढले. भारतीयांनी आत्मचिंतन करणे गरजेचे असून काही निर्णय घेणे महत्वाचे वाटते. भारताची घटना ही निर्धार, जाहीरनामा आहे. समाज कसा असणार आहे, याचे चित्र व स्वप्न भारतीय संविधानात पाहिले आहे. भारतीय संविधानातील मूल्ये आपल्या प्राचीन संस्कृतीत आहे. भारत हा प्राचीन देश आहे. त्याचे रूपांतर आधुनिक राष्ट्रामध्ये करायचे आहे. स्वातंत्र्याच्या पंचाहत्तरीत राज्यघटनेला अनुसरून समाज दिसतो का?
भारतीयत्वाचा अभिमान संविधानाचा सन्मान मला वाटतो. जगामध्ये सर्व धर्म असून ते भारतात आहेत. विविध धर्म भारतात असून, ते एकसंघ ठेवण्याचे प्रतिज्ञा घेतली आहे.
आपण संविधानाला अपेक्षित असलेला समाज निर्माण केला आहे का? स्वातंत्र्याला 75 वर्षे झाली आहेत, आपण संविधानाला अपेक्षेप्रमाणे कार्य केले आहे का? याचा विचार केला पाहिजे. लोकशाही जीवनशैली झाली पाहिजे. समता, स्वातंत्र्य आणि बंधुभाव समाजात नसेल, तर आपण लोकशाही प्रगल्भ करू शकणार नाही. गेल्या 75 वर्षात आपण लोकशाही प्रगल्भ करण्यासाठी काय केले याचा विचार केला पाहिजे. संविधानाने धर्म स्वातंत्र्य दिले आहे. ते समाजाला नाही तर व्यक्तीला दिले आहे. धर्म स्वातंत्र्य हे विवेकाचे स्वातंत्र्य आहे. धर्मस्वातंत्र्य पाळताना आणि सार्वजनिक आरोग्य धोक्यात येणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. अनुकरण आणि अंधभक्ती वाढत चालली आहे. आपण काहीच साध्य केले नाही, असे म्हणता येणार नाही. अनेक क्षेत्रात आपण प्रगती केली आहे. आपल्याला आता बंधुभाव आणि प्रेमभाव वाढवणे आवश्यक आहे. आपण वेगळेपणाचा स्वीकार केला पाहिजे. भारत हा विविधतेतून निर्माण झाला आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा