पुणे ः भारतीय जनता पक्षाचे पश्‍चिम महाराष्ट्र प्रवक्ते विनायक आंबेकर यांना शनिवारी दुपारी त्यांच्याच कार्यालयात जाऊन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी चोप दिला. आंबेकर यांनी दोन दिवसांपूर्वी समाजमाध्यमावर शरद पवार यांच्या विरोधात आक्षेपार्ह पोस्ट टाकली. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे कर्यकर्ते संतप्त झाले होते. 
आंबेकर यांनी दोन दिवसांपूर्वी पवार यांच्या विरोधात समाजमाध्यमावर टिका केली होती. पातळी सोडून टिका केल्याचा आरोप करत चिडलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते शनिवारी दुपारी आंबेकर यांच्या कार्यालयात घुसले. त्यानंतर त्यांना जाब विचारून त्यांना श्रीमुखात लगावून चोपदेखील दिला. दरम्यान, आंबेकर यांच्या पोस्टविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने विश्रामबाग पोलिस ठाण्यात तक्रार देण्यात आली. आंबेकर यांनीदेखील मारहाणप्रकरणी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांविरोधात तक्रार दिली आहे. मात्र, ही तक्रार दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपदेखील आंबेकर यांनी केला आहे.
इतरांप्रमाणेच मलादेखील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा अधिकार आहे. माझ्यावरील हल्ल्यामागे राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे आहेत, असा आरोप यावेळी आंबेकर यांनी केला. माझ्या कवितेत शेवटच्या दोन ओळी चुकीच्या लिहिल्या गेल्या होत्या. त्यामागे कोणताही वाईट हेतू नव्हता. मात्र, तरीदेखील त्यामुळे लोकांच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत, असे खासदार गिरीश बापट यांनी कळवले आहे. त्यामुळे मी ही पोस्ट मागे घेत आहे. ज्यांच्या भावना दुखावल्या गेल्या त्यांची माफी मागत?आहे, असे स्पष्टीकरण आंबेकर यांनी दिले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा