मुंबई ः हिंदुत्वाचा बुरखा फाटल्यानंतर भाजपचा भेसूर, विद्रूप आणि विकृत चेहरा देशासमोर आला, अशा तिखट शब्दांत शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टीका केली.
उद्धव यांनी काल बीकेसी मैदानावरील सभेत भाजपचा खरपूस समाचार घेतला. तसेच, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे ‘मुन्नाभाई’ असे वर्णन करत टोला लगावला.
अटल बिहारी वाजपेयी पेट्रोलचे दर 7 पैसे वाढले म्हणून संसदेत बैलगाडीतून गेले होते. ती संवेदनशीलता कुठे गेली? असा सवाल उद्धव यांनी केला. ते म्हणाले, मुंबईत भाजपची रामभाऊ म्हाळगी संस्था आहे. त्या ठिकाणी भाजप नेते ‘कुंथन’ करतात! तिथे काय शिकवतात? खोटे बोलणे हे त्यांच्या हिंदुत्वात बसते, आमच्या हिंदुत्वात बसत नाही.
काश्मिरी पंडित राहुल भट याला कार्यालयात घुसून गोळ्या घातल्या. तिथे हनुमान चालीसा म्हणायची का? टिनपाटांना झेड सुरक्षा व्यवस्था पुरवता,  काश्मिरी पंडितांना सुरक्षा द्यायला हवी आहे, असे उद्धव म्हणाले. भाजपची मंडळी महागाईवर बोलत नाहीत. स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव सुरू झाला आहे. आपल्या रुपयाचाही अमृतमहोत्सव झाला आहे!
देवेंद्र फडणवीस यांच्या मालकाची इच्छा आहे की, मुंबई स्वतंत्र करणार. मात्र, ते कदापि शक्य होणार नाही, असेही उद्धव म्हणाले.
अहमदाबाद ते मुंबई बुलेट ट्रेन आणत आहेत. ती कुणाला हवी आहे? हा मुंबई तोडण्याचा डाव आहे. मुंबई स्वतंत्र करणार म्हणजे काय करणार? मुंबई काय पारतंत्र्यात आहे? ज्या ज्या वेळी मुंबईवरती आपत्ती येते, तेव्हा धावून जाणारा, माझा शिवसैनिक असतो, असेही ते म्हणाले.  
अयोध्येतील बाबरी मशीद पडताना देवेंद्र फडणवीस त्याठिकाणी असते आणि त्यांनी बाबरीच्या ढाच्यावर नुसता चढायला प्रयत्न केला असता तर त्यांच्या वजनामुळेच बाबरी खाली कोसळली असती. कारसेवकांना इतकी मेहनत करायची गरजच लागली नसती, असा खोचक टोलाही त्यांनी फडणवीस यांना लगावला.  

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा