आमदार भोसलेंच्या पाच एकर जमिनीचा होणार लिलाव

पुणे : शिवाजीराव भोसले सहकारी बँकेतील आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी आमदार अनिल भोसले यांच्या उरळी कांचन येथील पाच एकर जागेचा लवकरच लिलाव करण्यात येणार आहे. याबाबत सहकार विभागाकडून कार्यवाही करण्यात येत असून संबंधित मालमत्ता घेण्यासाठी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीने पुढाकार घेतला आहे. दरम्यान, चालू वर्षी जानेवारी महिन्यात समोर आलेल्या चाचणी लेखापरीक्षणात बँकेचे अध्यक्ष, संचालक, अधिकारी, कर्मचार्‍यांसह संबंधितांवर आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चित करण्यात येत असून, त्या अंतर्गतच हा लिलाव करण्यात येणार आहे.

बँकेच्या आर्थिक गैरव्यवहाराची रक्कम 72 कोटी रुपयांवरून 436 कोटी रुपये झाली असल्याचे सहकार विभागाच्या चाचणी लेखापरीक्षणात समोर आले आहे. त्यानुसार बँकेचे अध्यक्ष, संचालक, अधिकारी, कर्मचार्‍यांसह संबंधितांवर आर्थिक नुकसानीची जबाबदारी निश्चितीची कार्यवाही केली जाणार आहे. बँकेच्या पाच लाख रुपयांपेक्षा कमी ठेवी असलेल्या ठेवीदारांना ठेव विमा महामंडळाकडून (डीआयसीजीसी) त्यांची रक्कम देण्यात येत आहे. जिल्हा विशेष लेखापरीक्षकांनी तयार केलेल्या चाचणी लेखापरीक्षणामध्ये या बँकेच्या संचालक आणि अधिकार्‍यांविरुद्ध गैरव्यवहाराचा ठपका ठेवला आहे. चाचणी लेखापरीक्षण अहवालावर सहकार आयुक्तांनी फौजदारी गुन्हा दाखल करण्याचे आदेश लेखापरीक्षकांना दिले आहेत. कलम 88 नुसार चौकशीचे आदेशही दिले आहेत. त्यानुसार बँकेच्या आर्थिक नुकसानीला जबाबदार असणार्‍यांची सविस्तर चौकशी केली जात असून, ही चौकशी झाल्यानंतर नुकसानीला जबाबदार असलेल्या व्यक्तींवर जबाबदारी निश्चित करण्यात येत आहे. त्यानुसार संबंधितांच्या मालमत्तेतून बँकेचे झालेले नुकसान वसुलीचे अधिकार बँकेला प्राप्त होणार आहेत.

याबाबत बोलताना सहकार विभागाचे शहर उपनिबंधक आणि बँकेचे अवसायक आर. एस. धोंडकर म्हणाले, ‘आतापर्यंत बँकेच्या 17 हजार 500 ठेवीदारांना 268 कोटी रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. वाटप केलेल्या रकमेत ठेव विमा महामंडळ आणि काही बँकेच्या रकमेचाही समावेश आहे. उरळी कांचन येथील मालमत्तेचा यापूर्वी दोन वेळा लिलाव करण्याची प्रक्रिया करण्यात आली. मात्र, मालमत्तेची किंमत जास्त असल्याचे कारण देत कुणीही पुढे आलेले नाही. आता पुन्हा तिसर्‍यांदा लिलाव प्रक्रिया राबविली जाणार आहे.’आर्थिक गैरव्यवहाराची जबाबदारी निश्चित करून ही लिलावाची कार्यवाही करण्यात येत असल्याचे राज्यातील नागरी बँकांचे उपनिबंधक आनंद कटके यांनी स्पष्ट केले.

सहकार विभागाकडून उरळी कांचन येथील लिलाव करण्यात येणारा भूखंड लिलाव प्रक्रियेतून घेण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समिती उत्सुक आहे. लिलाव प्रक्रियेत आम्ही सहभागी होणार असून ही जागा मिळाल्यास या ठिकाणी उपबाजार करण्याचे प्रस्तावित केले आहे. या ठिकाणी अत्याधुनिक सोयी-सुविधा दिल्या जातील. शीतगृहासह विविध सुविधा निर्माण केल्या जातील.

मधुकांत गरड, प्रशासक, पुणे कृषी उत्पन्न बाजार समिती

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा