पुणे : विज्ञान हे केवळ प्रयोगशाळेत, संशोधनामध्ये नसून ते सर्वत्र आहे. निसर्गात विज्ञान असून ते पाहण्यासाठी दृष्टीकोन असायला हवा. दैनंदिन आयुष्याचा भाग विज्ञान आहे. त्यामुळे जळ, स्थळी, काष्टी विज्ञान असल्याचे मत डॉ. आरती रानडे यांनी व्यक्त केले.

वक्तृत्वोत्तेजक सभेतर्फे आयोजित ‘वसंत व्याख्यानमाले’च्या 148 व्या ज्ञानसत्रात ‘जळी स्थळी…. विज्ञान’ या विषयावर आरती रानडे यांनी 22 वे पुष्प गुरुवारी गुंफले. आपण दररोज ज्या गोष्टी करतो, त्याचे बारकाईने निरिक्षण केल्यास विज्ञान समजून घेता येईल, असे डॉ. रानडे यांनी स्पष्ट केले.

कोरोनाच्या काळात आपण विषाणू, रेमडिसिव्हिर, रोगप्रतिकारक शक्ती, आरटीपीसीआर चाचणी, असे शब्द अनेकदा उच्चारले असतील. त्यामुळे एकप्रकारे जे शब्द कधीही एकले नसतील ते रोजच्या जीवनाचा भाग बनले होते. त्यामुळे विज्ञान आपल्या दैनंदिन जीवनाचा भाग बनला होता असे त्या म्हणाल्या.

कोणत्याही गोष्टीकडे पाहताना जास्ती जास्त शक्यतांचा विचार करणे विज्ञानाच्या दृष्टीने आवश्यक असते. भोवतालच्या विज्ञानाचा शोध घेताना शोधक वृत्ती, निरिक्षक शक्ती, शोधक वृत्तीची आवश्यकता असते. विज्ञान एक प्रकारची साधनाच आहे. हाती असलेल्या माहितीचे आधारे बांधलेले अंदाज चुकू शकतात. विज्ञान ही वाहती गोष्ट आहे. नवी माहिती आली की पूर्वीचे गृहितके बाद होतात.

खुप कमी लोकांना स्वत:चा शोध घेता येतो. माहितीचे ज्ञानात रूपांतर करण्यासाठी विज्ञान हा चांगला मार्ग आहे. जग झपाट्याने बदलत आहे. माहितीचा भडीमार होतोय. त्यामुळे मानवी तणाव वाढले आहेत. अशा परिस्थितीत विज्ञान समजून घेण्याची गरज आहे. ऋतुचे चक्र बदलले आहे. अन्न भेसळ आहे. पाणीही अशुद्ध आहे. एखाद्या गोष्टींचा अतिरेक झाला की त्याचे दुष्परिणामही दिसतात.परिसरात निसर्गात विज्ञान दडलेले असून ते आपल्याला डोळसपणे पाहता आले पाहिजे. झाडांचा, फुलांचा व पानांमध्ये वैज्ञानिक रचना ?ठरलेली असते. यामध्ये उदाहरण म्हणून पाहिल्यास सूर्यफुलांची वैशिष्ट्यपूर्ण रचना आहे. त्या फुलांच्या बियांची संख्या शास्त्रीय आहे. या फुलांची चक्राकर रचना असून ही रचना गोगलगायींच्या पायांमध्येदेखील आढळून येते. निर्सगात एकमेकांवर अवलंबून असणारी असंख्य उदाहरणे दिसून येतील, असेही यावेळी डॉ. रानडे यांनी सांगितले. निसर्गात विज्ञान दडले असून ते मिळविण्यासाठी प्रत्येकाने दृष्टीकोन निर्माण केला पाहिजे. वैज्ञानिक दृष्टीकोन आपल्यात आणण्यासाठी विज्ञानाचा अभ्यास आपण केला पाहिजे, असेही यावेळी त्यांनी नमूद केले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा