स्वराज्य पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा

पुणे : राज्यसभा खासदारपदाची सहा वर्षांची मुदत संपुष्टात आल्यानंतर छत्रपती संभाजी राजे यांनी नवीन पक्ष स्थापन करावा, अशी मागणी अनेकजण करत होते. परंतु आपण राजकीय वाटचालीच्या सुरुवातीच्या टप्प्यात ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करुन राज्यभर दौरा करणार आहोत. लोकांची मते जाणून घेतल्यानंतर संघटनेचा कार्यविस्तार करण्यात येईल. तसेच, आगामी जुलै महिन्यात राज्यसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवणार आहे. त्याकरिता सर्व पक्षांनी आपल्याला सहकार्य करावे, असे आवाहन छत्रपती संभाजी राजे यांनी गुरुवारी पत्रकार परिषदेत केले आहे.

संभाजीराजे म्हणाले, घरी कौटुंबिक वैभव असतानाही त्यात अडकून न पडता, केवळ समाज हिताच्या कामाकरिता सन 2007 पासून मी राज्यभरात फिरत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांचे विचार तळागाळापर्यंत पोहचविण्यामुळे लोकांकडून एक वेगळीच ऊर्जा मला मिळते. सहा वर्षांच्या खासदारकीच्या काळात राजकारणविरहित भूमिका मी घेतल्या असून, अनेक विषय दिल्ली दरबारी मार्गी लावण्याचा सातत्याने प्रयत्न केला आहे. जुलै महिन्यात राज्यातील राज्यसभेच्या सहा जागा रिक्त होणार आहे. त्यापैकी दोन जागा भाजपकडे, प्रत्येकी एक जागा राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेस व शिवसेना यांच्याकडे असून सहाव्या जागेसाठी कोणत्याही पक्षाला पुरेसे संख्याबळ नाही. त्यामुळे या जागेसाठी आवश्यक 27 मते आघाडीकडे, तर 22 मते भाजपकडे असून राज्यातील 29 अपक्ष आमदारांची भूमिका ही यासाठी महत्वपूर्ण आहे. त्यामुळे संबंधित मते मला मिळावी याकरिता मी सर्वांच्या भेटीगाठी घेणार आहे.

भविष्यात मी कोणत्याही पक्षात जाणार नसून माझ्या आतापर्यंतच्या योगदानाची दखल घेऊन मला अपक्ष म्हणून पाठबळ मिळावे. सर्व पक्षांकरिता मी पोषक उमेदवार आहे.

स्वराज्याची भविष्यात राजकीय पक्षाकडे वाटचाल

संभाजीराजे म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज यांच्यावर प्रेम करणारे सर्वजण एका छताखाली यावेत, सर्वांना संघटित करून दिशा देण्याकरिता व न्याय देण्याकरिता ‘स्वराज्य’ संघटनेची स्थापना करण्यात येत आहे. राजकीय वाटचालीचा हा पहिला टप्पा असून, त्यात स्वराज्य संघटित करण्याचे ध्येय आहे. भविष्यात स्वराज्य राजकीय पक्ष झाला तर कोणी त्यात वावगे समजू नये, मी तशी तयारी ठेवली आहे. राजकीय पक्ष काढणे कोणतीची चूक नसून ताकद समजून घेण्याकरिता राज्यभरात दौरा करणार आहे. संघटनेचे कोणतेही चिन्ह, झेंडा ठरलेला नसला तरी केशरी रंग त्यात राहणार आहे. आगामी काळात राज्यातील कोणत्याही मतदारसंघात मी लोकसभा निवडणूक लढू शकतो अशी माझी ताकद आहे.

तुळजापूर मंदिरातील प्रकार चुकीचाच

तुळजापूर येथील तुळजाभवानी मंदिरात छत्रपती संभाजी राजे यांना गाभार्‍यात दर्शन घेण्यास विश्वस्ताने विरोध दर्शवला. या पार्श्वभूमीवर गुरुवारी तुळजापूर बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत संभाजीराजे म्हणाले, छत्रपती घराण्याची तुळजाभवानी प्रमुख देवी आहे. ब्रिटिश, निजाम शाहच्या राजवटीत जे कायदे घडले नाही त्याचा अट्टहास आता का केला जात आहे? प्रशासकीय लोकांनी प्रथम देवीच्या मंदिराचा इतिहास जाणून घ्यावा. पहिला नैवैद्य, अभिषेकाचा मान कोणाला आहे हे त्यांनी तपासावे. तुळजापूर बंदची सरकारने दखल घ्यावी आणि लोक अशाप्रकारे संघटित झाले याचे चिंतन करावे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा