पुणे : पुणे रेल्वे स्थानक परिसरात बॉम्बसदृश्य वस्तू आढल्याने पोलिसांनी परिसरात तपासणी केली. मात्र त्याचा रेल्वे गाड्यांवर कोणताही परिणाम झाला नाही. ये-जा करणारी एकही गाडी स्थानक किंवा स्थानक परिसरात थांबविण्यात आली नाही. सर्व गाड्या वेळापत्रकानुसार धावल्या. त्यामुळे प्रवाशांची गैरसोयही झाली नसल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
पुणे रेल्वे स्थानकाच्या समोरच्या भागात जुन्या दत्त मंदिरा जवळ संशयास्पद वस्तू आढळ्याने पोलिसांनी याच भागापुरते बॅरिगेटस् लावून तेथील पाहणी केली. तेथे उपस्थित असणार्‍यांना बाजूला केले. त्यामुळे प्रत्यक्ष स्थानकात या घटनेचा कोणताही परिणाम झाला नाही. सर्व फलाटावरून गाड्यांची ये-जा सुरू होती. प्रवाशांची गैरसोय होणार नाही, याची खबरदारी पोलिसांसह रेल्वे प्रशासनाने घेतली होती. पोलिसांनी खबरदारी म्हणून सबंधित भागात तपासणी केली असल्याचेही रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.
सकाळी सुमारे 10.30 वाजता पुणे पोलिस रेल्वे स्थानकावर आले. त्यांनी ज्या ठिकाणी संशयित वस्तू आढळली त्याच ठिकाणी बॅरिगेटस लावले. पोलिसांनी रेल्वे स्थानकात येणार्‍या प्रवाशांना अडविले नाही. तसेच स्थानकातून बाहेर जाणार्‍या प्रवाशांनाही अडविण्यात आले नाही. रेल्वे स्थानकावरील कामकाज नियमित सुरू होते. सुमारे एक तास तपास केल्यानंतर पोलिस रेल्वे स्थानकातून गेले. त्यानंतरही रेल्वे स्थानकावरील कामकाज सुरूच राहिले. तसेच रेल्वे गाड्या वेळापत्रकानुसार धावत होत्या. या घटनेच्या प्रारंभीच्या काळात प्रवाशांना बाहेर काढण्यात आले आहे. रेल्वे गाड्याही थांबविण्यात आल्या असल्याची माहिती सर्वत्र पसरविली जात होती. मात्र प्रत्यक्षात तसे काहीच घडले नाही. समाज माध्यमांवर पसरलेली माहिती चुकीची होती. पोलिस आणि रेल्वे प्रशासनाने एकही गाडी थांबविली नसल्याचेही रेल्वे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा