पुणे : नव्याने बांधण्यात येणारे बालगंधर्व रंगमंदिर कसे असेल? त्यात काय काय सुविधा असतील? त्याची अंतर्गत व बाह्य रचना कशी असेल? यासह अन्य प्रश्नांचा खुलासा करण्यासाठी सर्व पक्षीयांची बैठक बोलावून त्यांच्या समोर बालगंधर्वच्या आराखड्याचे सादरीकरण करावे. त्यामुळे आंदोलन थांबतील आणि बालगंधर्वचा प्रश्न मिटेल, अशी मागणी राष्ट्रवादीच्या चित्रपट, साहित्य, कला, सांस्कृतिक विभागाकडून अजित पवार व महापालिका आयुक्तांकडे करण्यात आली आहे.
आराखडा सादरीकरणाच्या बैठकीला सर्व राजकीय पक्षाचे सांस्कृतिक सेलचे प्रमुख, नाट्य निर्माते, लावणी निर्मात्यांना बोलविण्यात येणार आहे. तसेच या बैठकीला पालकमंत्री अजित पवार व महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनाही उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. सर्वांना एकत्र करून बालगंधर्वचा प्रश्न मिटविण्यासाठी राष्ट्रवादी चित्रपट व सांस्कृतिक विभागाच्या पदाधिकार्‍यांनी पुढाकार घेतला आहे. सर्व पक्षीयांना एकत्र बोलावून येत्या आठवड्यात त्यांना बालगंधर्वच्या नव्या आराखड्याचे सादरीकरण दाखविले जाणार असल्याचे संकेत आहेत.
बालगंधर्व रंगमंदिर ही पुण्याची ओळख आहे. त्यामुळे ही वास्तू पाडली जावू नये, अशी भूमिका काही राजकीय पक्ष व नाट्य कलावंतांनी घेतली आहे. त्यामुळे बालगंधर्व रंगमंदिराचा प्रश्न रोजच चर्चेला जात आहे. बालगंधर्व रंगमंदिराच्या आराखड्याबाबतच्या सादरीकरणारा सर्व पक्षाच्या सांस्कृतिक विभागाच्या प्रमुखांनी येण्याची तयारी दर्शविली आहे. त्यामुळे या बैठकीतून बालगंधर्व रंगमंदिर पाडण्याचा वाद मिटण्याची चिन्हे आहेत.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा