काही वेळ वाहतूक कोंडी राहणार

मुंबई-पुणे महामार्गावर खंडाळा घाटातील आडोशी बोगद्याजवळ भीषण अपघात झाला आहे. लोखंडी कॉईलची वाहतूक करणाऱ्या ट्रेलर चालकाचे येथील तीव्र उतारावर वाहनावरील नियंत्रण सुटल्याने ट्रेलर पुढे जाणाऱ्या एका टेम्पोला धडकून महामार्गावर उलटला, तर टेम्पोही या धडकेत उलटला आहे. अपघातात ट्रेलर चालकाचा जागीच मृत्यू झाला.

अपघातामुळे मुंबईकडे जाणारी वाहतूक विस्कळीत झाली असून, वाहनांच्या लांब रांगा लागल्या आहेत. बोरघाट दस्तुरी महामार्गाचे पोलीस व खोपोली पोलिसांसह देवदूत आपत्कालीन पथक आयआरबीचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले असून, अपघातग्रस्त वाहने व मार्गावर पडलेल्या लोखंडी कॉईल क्रेनच्या सहाय्याने बाजूला करून वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न करत आहे. महामार्गावरील अपघातानंतर वाहतूक कोंडीमुळे वाहने जुन्या पुणे मुंबई मार्गावर वळवण्यात आली आहेत. महामार्गावरील वाहतूक पूर्ववत होण्यासाठी आणखी काही वेळ लागण्याची शक्यता आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा