सेऊल : उत्तर कोरियाने दोन वर्षांहून अधिक काळ कोरोना संसर्ग नसल्याचे सांगितले होते. मात्र आता पहिल्यांदाच कोरोनाच्या रुग्णसंख्येचा उद्रेक उत्तर कोरियात झाल्याची कबुली देण्यात आली असून, अध्यक्ष किम जोंग उन यांनी गुरुवारी देशव्यापी लॉकडाउन लागू करण्याची घोषणा केली आहे. उत्तर कोरियात कोरोनाचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास त्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात. कारण देशात खराब आरोग्य सेवा प्रणाली आहे. 26 दशलक्ष लोकांपैकी बहुतांश लोकांनी लसीकरण केलेले नाही.

अधिकृत कोरियन सेंट्रल न्यूज एजन्सीने सांगितले की, राजधानी प्योंगयांगमध्ये ताप असलेल्या अनिर्दिष्ट संख्येच्या लोकांकडून रविवारी गोळा केलेल्या नमुन्यांच्या चाचण्यांमुळे त्यांना ओमिक्रॉन प्रकाराने संसर्ग झाल्याची पुष्टी झाली. त्यामुळे राष्ट्राध्यक्ष किम जोंग उन यांनी संपूर्ण लॉकडाउनचे आवाहन केले आहे. किम यांनी सत्ताधारी पक्षाच्या पॉलिटब्युरोच्या बैठकीत अधिकार्‍यांना व्हायरसच्या नियंत्रणामध्ये होणार्‍या गैरसोयी कमी करताना, प्रसार थांबवण्यासाठी आणि संसर्ग स्रोत शक्यतितक्या लवकर दूर करण्याचे आवाहन केले.

2020 च्या सुरुवातीस, जगभरात कोरोनाव्हायरस पसरण्यापूर्वी, उत्तर कोरियाने विषाणूपासून दूर राहण्यासाठी कठोर पावले उचलली. कोविड-19 सारखी लक्षणे असलेल्या लोकांना अलग ठेवले, दोन वर्षांसाठी सीमापार रहदारी आणि व्यापार थांबवला, आणि सैन्याला कारवाई करण्याचे आदेशही दिले होते, असे मानले जाते.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा