राज्य निवडणूक आयोगाचा सर्वोच्च न्यायालयात अर्ज

मुंबई, (प्रतिनिधी) : प्रभाग रचनेचे काम जूनपर्यंत पूर्ण झाले तरी पावसाळ्यात निवडणूक घेणे अडचणीचे असल्याने महापालिका व नगरपालिका निवडणुका सप्टेंबरमध्ये, तर जिल्हा परिषदेच्या निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाला केली आहे.

निवडणुकांबाबतचे राज्य निवडणूक आयोगाकडे असलेले काही अधिकार आपल्याकडे घेण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला होता. परंतु, सर्वोच्च न्यायालयाने हा निर्णय रद्दबातल ठरवताना, 15 दिवसांत निवडणुकीची प्रक्रिया पुन्हा सुरू करण्याचे आदेश मागच्या आठवड्यात दिले आहेत. इम्पिरिकल डेटा सादर केल्याशिवाय ओबीसी आरक्षण देता येणार नाही व ओबीसी आरक्षण नाही म्हणून निवडणुका रोखता येणार नाहीत, असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगाने मार्चमध्ये थांबलेली प्रभाग रचनेची प्रक्रिया पुन्हा सुरू केली आहे. मात्र, यासाठी लागणारा कालावधी व पाठोपाठ येणारा पावसाळा यामुळे लगेच निवडणूक घेणे शक्य नाही. त्यामुळे सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात या निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी, असा विनंती अर्ज राज्य निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात केला आहे. महापालिका आणि नगर पंचायतीच्या निवडणुका सप्टेंबरमध्ये, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत निवडणुका ऑक्टोबरमध्ये घेण्यास परवानगी द्यावी, अशी विनंती आयोगाने केली आहे.

पावसाळ्यात राज्यातल्या अनेक भागांत पूरस्थिती असते. सरकारी कर्मचारी पूर नियंत्रणाच्या कामात व्यस्त असतात. या काळात मतदान यंत्र व निवडणूक कर्मचार्‍यांची वाहतूक करणेही अडचणीचे होते. शिवाय आयोगाकडे असलेल्या ईव्हीएमची संख्या मर्यादित आहे. त्यामुळे एका टप्प्यासाठी वापरलेले ईव्हीएम पुन्हा दुसर्‍या टप्प्यासाठी वापरावे लागतात. सगळ्या निवडणुका एकत्रित झाल्यास मतदान केंद्रांवर निवडणूक कर्मचारी व पोलीस फौजफाटा उपलब्ध करुन देणेही अवघड होते. शिवाय पावसाळ्यात मतदानाची टक्केवारी कमी होण्याची भीती आहे. त्यामुळे पावसाळ्यानंतर निवडणुका घेण्याची परवानगी द्यावी, अशी विनंती आयोगाने केली आहे. या अर्जावर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता असून, न्यायालय काय निर्णय देणार यावर निवडणुकीचे वेळापत्रक ठरणार आहे.

राज्यात 15 महानगरपालिका, 25 जिल्हा परिषदा, 210 नगरपंचायती, 1900 ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रलंबित आहेत. या सगळ्या निवडणुका एकत्र घ्यायच्या झाल्यास त्या किमान 2 ते 3 टप्प्यांत घ्याव्या लागतील व त्यासाठी 6 आठवडे लागतील.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा