कोलंबो : माजी पंतप्रधान महिंदा राजपक्षे, त्यांचा मुलगा नमल राजपक्षे आणि इतर 15 जणांना देश सोडण्यास श्रीलंकेच्या न्यायालयाने मनाई केली आहे.
महिंदा राजपक्षे समर्थकांनी सरकारविरोधी निदर्शकांवर हल्ला केल्यानंतर श्रीलंकेत हिंसाचार उसळला आहे. आंदोलकांनी पंतप्रधानांच्या सरकारी आणि वडिलोपार्जित निवासस्थानाला आग लावली. या हिंसाचारात आतापर्यंत आठ जणांना प्राण गमवावे लागले आहे. तर,?200 हून अधिक जण जखमी आहेत.

गेल्या काही दिवसांपासून श्रीलंकेत प्रचंड आर्थिक टंचाई आहे. यासाठी नागरिकांनी पंतप्रधानांना जबाबदार धरले आहे. जनरेट्यामुळे राजपक्षे यांना पंतप्रधान पदाचा राजीनामा द्यावा लागला. सध्या ते नौदलाच्या आश्रयात आहेत. फोर्ट मॅजिस्ट्रेट कोर्टाने राजपक्षे यांच्यासह जॉन्स्टन फर्नांडो, पवित्रा वान्निराचची, संजीवा इदिरिमाने, कांचना जयरत्ने, रोहिता अबेगुनार्धेना, सी. बी. रत्नायके, संपत अथुकोराला, रेणुका परेरा, सनत निशांत, वरिष्ठ उपमहानिरीक्षक देशबंधू तेन्नेकून यांना परदेश प्रवास बंदी करण्यात आली आहे. दरम्यान, राजपक्षे भारताच्या आश्रयास गेल्याचे वृत्त पसरले होते. मात्र, त्यानंतर श्रीलंकेतील भारतीय उच्चायुक्तांनी निवेदन जारी करत हे वृत्त फेटाळून लावले आहे.

रानिल विक्रमसिंघे श्रीलंकेचे नवे पंतप्रधान

विरोधी पक्षनेते आणि माजी पंतप्रधान रानिल विक्रमसिंघे यांनी गुरुवारी श्रीलंकेचे 26 वे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. श्रीलंकेच्या 225 सदस्यांच्या संसदेत युनायटेड नॅशनल पार्टीचे नेते रानिल विक्रमसिंघे यांच्याकडे केवळ एकच जागा आहे. विक्रमसिंघे यांनी चार वेळा पंतप्रधानपद भूषविले आहे. अध्यक्ष गोताबया राजपक्षे यांच्या कार्यालयात शपथविधी कार्यक्रम पार पडला. आर्थिक संकटामुळे महिंदा राजपक्षे यांना पंतप्रधान पदावरून पायउतार व्हावे लागले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा