नवी दिल्ली : देशात किरकोळ महागाई दरात तीव्र वाढ झाली आहे. एप्रिल महिन्यात किरकोळ महागाई दर 7.79 टक्क्यांवर पोहोचला. गेल्या आठ वर्षांतील हा उच्चांक आहे. याआधी, मार्च महिन्यात हा दर 6.95 टक्के होता.

खाद्यपदार्थ आणि अन्नधान्याच्या वाढलेल्या किंमती आणि महाग झालेले इंधन दर यामुळे महागाई दर 7.50 टक्के राहील, असा अंदाज आधीच वर्तवण्यात आला होता. तो आता खरा ठरला.

दुसरीकडे, बेरोजगारीचा दर एप्रिल महिन्यात 7.83 वर पोहोचला आहे. मार्च महिन्यात हा दर 7.60 टक्के इतका होता. ग्रामीण पेक्षा शहरी भागात बेरोजगारीचे प्रमाण अधिक आहे. शहरी भागात 9.22 टक्के तर ग्रामीण भागात 7.29 टक्के बेरोजगारी दर आहे. हरयानामध्ये तब्बल 34.5 टक्के बेरोजगारी दराची नोंद झाली असून राजस्तानमध्ये हा दर 28.8 टक्के इतका आहे.

देशातील वाढत्या चलनवाढीला आळा घालण्यासाठी मध्यंतरी रिझर्व बँकेने रेपो दरात 0.40 टक्क्यांची वाढ केली. त्यामुळे रेपो दर 4.40 टक्क्यांवर पोहोचला. तर, काही बँकांनी व्याज दरात वाढ केली. त्यामुळे गृह, वाहन आणि इतर कर्जाच्या हप्त्यांमध्ये वाढ झाली असून सर्वसामान्यांना कर्ज घेणे अधिक महाग झाले आहे.

रुपया नीचांकी पातळीवर

अमेरिकन डॉलरच्या तुलनेत गुरूवारी रुपया 25 पैशांनी घसरून 77.50 या सर्वकालीन नीचांकी पातळीवर बंद झाला. त्यामुळे आता एका डॉलरसाठी 77.50 रुपये मोजावे लागत आहेत. रशिया-युक्रेन संघर्ष, चीनमधील कोरोनाचे वाढते संकट आणि खनिज तेलाच्या वाढत्या भावामुळे महागाईत भर पडत आहे. त्यामुळे रुपया विक्रमी घसरण झाली आहे. पाकिस्तान, श्रीलंका, म्यानमार, नेपाळची आर्थिक स्थितीही बिकट झाली असून त्यांना डॉलरसाठी जादा पैसे मोजावे लागत आहेत. परकीय चलन बाजारात काल रुपया ग्रीनबॅकच्या तुलनेत 77.52 वर वर उघडला. दिवसअखेर 77.50 वर स्थिरावला.

निर्देशांकात घसरण कायम

मुंबई शेअर बाजरात सलग पाचव्या दिवशी निर्देशांकात घसरण पाहायला मिळाली. गुरूवारी निर्देशांक 1,158.08 टक्क्यांनी घरसला. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 359.10 अंशांनी घसरला. दिवसअखेर निर्देशांक 52,930.31 वर स्थिरावला. तर निफ्टी 15,808 अंकांवर बंद झाला. बुधवारी निर्देशांक 246.46 अंक आणि निफ्टी 72.95 अंकांनी घसरला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा