सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा १२० वा पदवीप्रदान सोहळा उत्साहात

पुणे : महाराष्ट्रातील सर्व विद्यापीठांमध्ये एकाच कोणत्यातरी ठराविक दिवशी पदवीप्रदान समारंभ व्हावा, जेणेकरून एकाचवेळी लाखो विद्यार्थ्यांना पदवी देणारे हे राज्य ठरेल, असे प्रतिपादन उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मागील बाजूस असणार्‍या हिरवळीवर १२० वा पदवीप्रदान समारंभ पार पडला. त्यावेळी सामंत बोलत होते. राष्ट्रीय मूल्यांकन व मान्यता परिषदेचे (नॅक) चे अध्यक्ष डॉ. भूषण पटवर्धन, विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर, प्र-कुलगुरू डॉ.एन.एस.उमराणी, कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार, अधिष्ठाता व परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. संजीव सोनवणे, अधिष्ठाता डॉ. मनोहर चासकर, डॉ. पराग काळकर, डॉ. अंजली कुरणे, सर्व व्यवस्थापन परिषद, अधिसभा सदस्य व विद्या परिषदेचे सदस्य आदी उपस्थित होते.

यावेळी सर्वोत्कृष्ट विद्यार्थी व 2020-21 व ’द प्रेसिडेंट ऑफ इंडिया डॉ. शंकर दयाळ शर्मा’ सुवर्ण पदकाची मानकरी रामकृष्ण मोरे कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाची रेणुका सिंग ही विद्यार्थिनी ठरली. या समारंभदारम्यान 75 विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते 121 सुवर्णपदके प्रदान करण्यात आली.

सामंत म्हणाले, कोरोना काळ, परदेशात विद्यापीठाचे दालन, मराठी भाषेसाठीचे प्रयत्न हे विद्यापीठाचे उल्लेखनीय काम आहे. यावेळी डॉ. करमळकर यांना उद्देशून सावंत म्हणाले की, तुम्ही कुलगुरू म्हणून सेवानिवृत्त होत असाल तरी आम्ही तुमच्या ज्ञानाचा उपयोग राज्याच्या प्रगतीसाठी करून घेणार.

डॉ. पटवर्धन म्हणाले, आपली मूळ संस्कृती न सोडता नवीन तंत्रज्ञानाची कास धरणारे आणि सर्वच क्षेत्रात पहिल्या दहा विद्यापीठांमध्ये असणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे देशाला दिशा देणारे विद्यापीठ आहे.

शैक्षणिक वर्ष एप्रिल, मे 2021 या वर्षातील पदवी, पदव्युत्तरपदवी, पदविका, पीएचडी, एमफील, स्तरावरील एकूण 1 लाख 18 हजार 222 विद्यार्थ्यांना पोस्टाद्वारे पदवी प्रमाणपत्र पाठविण्यात आली आहेत. यामध्ये 309 पीएचडीधारक आहेत. कला शाखा 2200, वाणिज्य 29 हजार 655, शिक्षणशास्त्र 1 हजार 430, अभियांत्रिकी 39 हजार 885, विधी 3 हजार 305, व्यवस्थापन 7 हजार 759, मेंटल मॉरल 5 हजार 577, फार्मसी 4 हजार 311, शारीरिक शिक्षण 13, विज्ञान 24 हजार 80 आणि तंत्रज्ञान 7 अशा एकूण 1 लाख 18 हजार 222 पदवी प्रमाणपत्राचे वाटप करत असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.

ज्या विद्यापीठातील संशोधनाचा पाया भक्कम ती विद्यापीठे पुढे जातील. रोज नवीन ज्ञानाची निर्मिती हे पुढील काळात आपले शिक्षणातील ध्येय असायला पाहिजे. विद्यापीठाने शिक्षण उद्योग यांचा समन्वय घडवून आणला, विद्यार्थ्यांना काळासोबत चालणारे नवे अभ्यासक्रम डिग्री प्लसच्या माध्यमातून दिले, स्टार्टअपसाठी रिसर्च पार्क फाउंडेशन उभे केले, 130 सामंजस्य कराराच्या माध्यमातून अनेक संस्थांशी जोडले गेले आणि परदेशातही आपले कॅम्पस सुरू केले. सार्वजनिक विद्यापीठामध्ये अनेक बाबतीत विद्यापीठाला आघाडीवर ठेवले.

  • डॉ. नितीन करमळकर, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा