सिग्नल फ्लायर असल्याचा पोलिसांचा खुलासा

रायगड : उरण तालुक्यातील माणकेश्वर समुद्रकिनारी बॉम्ब सदृश्य नळकांड्या सापडल्याने परिसरामध्ये खळबळ माजली होती. तपासणीनंतर या कांड्या मोठ्या जहाजांवर सिग्नल देण्यासाठी वापरण्यात येणारे फ्लायर असल्याचे निष्पन्न झाले आहे.

उरणच्या माणकेश्वर समुद्र किनारी सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास किनार्‍यावर खेळणार्‍या मुलांना काही नळकांड्या सापडल्या. या नळकांड्यांसोबत मुले खेळत असताना एक नळकांडी फुटली. त्यानंतर परिसरात बॉम्ब सदृश नळकांड्या सापडल्याची माहिती उरण, मोरा पोलीस ठाण्यात देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली असता माणकेश्वर समुद्र किनारी अनेक नळकांड्या पडून असल्याचे लक्षात आले. पोलिसांनी नळकांड्यांची तपासणी करून या बॉम्बसदृश नळकांड्या या मोठ्या जहाजावरील सिग्नल फ्लायर असल्याचे स्पष्ट केले. यामुळे येथील परिसरामधील तणाव निवळला आहे. मात्र, या सर्व प्रकाराबाबत पोलीस यंत्रणेला विचारणा केली असता निकामी झालेल्या या कांड्या मोठ्या प्रमाणात किनार्‍यावर भरतीच्या पाण्यासोबत आल्याचे पोलिसांनी सांगितले. अशाप्रकारच्या कांड्या किंवा त्यासदृश वस्तू किनारी भागात सापडल्यास पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा