पुणे : पुणे रेल्वे स्थानकात शुक्रवारी सकाळी बॉम्ब सदृश्य वस्तू सापडल्याने मोठी खळबळ उडाली. स्थानकाच्या मुख्य प्रवेशद्वारापाशी परिसरात वस्तू सापडल्या होत्या. या घटनेची माहिती मिळताच बॉम्बशोधक पथक घटनास्थळी पोहोचले आहे. या घटनेनंतर सुरक्षायंत्रणांनी वेगाने हालचाली सुरु केल्या.पुणे रेल्वे स्थानक रिकामे करण्यात आले होते तसेच पुण्याकडे येणाऱ्या सर्व रेल्वे गाड्या थांबण्यात आल्या.

त्यानंतर पुणे रेल्वे स्थानकाची कसून तपासणी करण्यात आली. पुण्याचे पोलीस आयुक्त अमिताभ आयुक्त घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्या देखरेखीखाली शोध मोहीम सुरु होती. बॉम्बशोधक आणि बॉम्बनाशक पथक याठिकाणी हजर आहे. यावेळी अमिताभ गुप्ता यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. सकाळी साडेदहाच्या सुमारास रेल्वे स्थानकावर स्फोटकसदृश वस्तू आढळली. प्रथमदर्शनी तरी या वस्तू जिलेटीन असल्याचे वाटत नव्हते. पण बॉम्बशोधक पथकाकडून या वस्तूंची तपासणी सुरु असल्याचे त्यांनी सांगितले होते. या घटनेनंतर पुणे पोलीस स्थानकाच्या परिसरातील पोलीस बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

तब्बल तासाभराच्या तपासणीनंतर रेल्वे स्थानकावर सापडलेल्या या वस्तू बॉम्ब नसल्याचे स्पष्ट झाले. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी याबद्दल माहिती देताना सांगितले की,” पुणे रेल्वे स्थानकावर कोणताही बॉम्ब किंवा स्फोटके आढळलेली नाहीत. फलाट क्रमांक १ आणि २ पुन्हा एकदा रहदारीसाठी खुले केले असून रेल्वे वाहतूकही पूर्ववत सुरु झाली आहे. ज्या वस्तू मिळाल्या आहेत, त्यांची तपासणी सुरु आहे. यामध्ये कोणतेही सर्किट किंवा स्फोटक घटक आढळून आलेले नाहीत. रेल्वे पोलीस आणि पुणे पोलिसांकडून याचा समांतररित्या तपास केला जाईल, अशी माहिती अमिताभ गुप्ता यांनी दिली.

उरणच्या समुद्रकिनाऱ्यावर कालच अशाच प्रकारच्या स्फोटकसदृश वस्तू सापडल्या होत्या. या जिलेटिनच्या कांड्या असल्याची शक्यता वर्तविण्यात आली होती. समुद्रकिनाऱ्यावर १० ते १२ स्फोटक कांड्या सापडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. समुद्रकिनारी या कांड्या सापडल्यामुळे माणकेश्वर ग्रामस्थांना जाण्यास बंदी घालण्यात आली आहे. संपूर्ण तपास होईपर्यंत नागरिकांनाही काळजी घेण्याचे आणि सतर्क राहण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता पुण्यात अशाच स्फोटकसदृश वस्तू सापडल्याने याचा काही संबंध आहे का, असा प्रश्न उपस्थित झाला होता.

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा